लाल मातीतला “यशवंतगड”!!
मालवण जवळच्या रेडी गावातील गणपतीसमोर उभा होतो. इथल्या आगळ्या-वेगळ्या नितांतसुंदर गणपतीची मूर्ती पाहून पाय हलत नव्हते. मन अगदी प्रसन्न झालं तेव्हाच बाजूला झालो. तेवढ्यात तिथेच कळालं कि गावातच यशवंतगड नावाचा किल्ला आहे. मग काय लगेच मोर्चा वळवला किल्ल्याकडे. रेडीच्या बीचला खेटून असलेला हा किल्ला पाहताक्षणीच मनामध्ये भरला. गाडी अलीकडेच लावली आणि मग निघालो या लाल मातीतल्या भक्कम किल्ल्याकडे. कोकणातले किल्ले पाहणे म्हणजे एक वेगळीच मजा असते. लाल माती, दगडी चिरे, समुद्रावरून येणारी हवा, नितांत सुंदर समुद्रकिनारे, कोकणी माणसं हे सारं काही एका किल्ल्याच्या भेटीत पाहता येतं. यशवंतगड चढताना लागणारी सुस्थितली प्रवेशद्वारे, त्यांचे भव्यदिव्य बुरुज पडके वाडे, अभेदय तटबंदी, आतली घनदाट झाडी पाहून इथे आल्याचं सार्थक झालं. सर्वात महत्त्वाचा उत्कर्ष बिंदू ठरला तो या किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारा रेडीचा आरस्पानी समुद्रकिनारा. किल्ला होता छोटासा पण याने मात्र भरभरून शिदोरी पाठीशी बांधून दिली होती. घरची बच्चेकंपनी खुश झाली.