हंपी येथील विठ्ठल मंदिर –
हंपी मधील सर्व ऐतिहासिक स्मारकांमध्ये विठ्ठला मंदिर हे नितांतसुंदर स्मारक म्हणून ओळखले जाते .या मंदिराच्या मुख्य कक्षातील ५६ दगडी खांबावर हाताने थाप मारली असता त्यातून सुमधुर संगीत ध्वनी बाहेर पडतात. या मंदिराच्या बाहेर प्रसिध्द असा दगडी रथ आहे. या मंदिरा बाबत लवकरच सविस्तर पोस्ट येईलच, आज फक्त या मंदिराच्या संदर्भात विठ्ठलाच्या मूर्ती बाबत बोलू……
भानुदासाची कथा :
विजयनगरचा राजा रामराय हा एकदा पंढरपूरला श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आला होता तेथील विठ्ठलाची सुबक मूर्ती पाहून त्याला फार आनंद झाला. देवाने आपल्याबरोबर विजयनगरला यावे अशी त्याने पार्थना केली. श्री विठ्ठलाने प्रसन्न होऊन त्याच्या सोबत येण्याचे मान्य केले, तेंव्हा ती मूर्ती विजयनगर ला नेऊन तिथे सुंदर मंदिर बांधून त्यात त्या मूर्तीची समारंभ पूर्वक स्थापना करण्यात आली. इकडे पंढरपूरला भक्तांना फार दुःख झाले व त्यांनी परम विठ्ठलभक्त भानुदास याला ती मूर्ती परत आणण्यासाठी आग्रह केला , त्यानेही ही जवाबदारी आनंदाने पत्करली. विजयनगरला जाऊन आपल्या भक्तीच्या जोरावर देवाचे मन त्याने वळविले , राजा ला साक्षात्कार झाला त्यामुळे राजनेही मूर्ती परत नेण्यास परवानगी दिली, अशी दंतकथा आहे. त्यामुळे या मंदिरात मूर्ती नाही व इथे कोणतीही पूजा विधी होत नसल्याचे सांगितले जाते.
स्वतः श्री विठ्ठलाचा नकार :
” स्वतः श्री विठ्ठलाने त्या मंदिराची भव्यता पाहून तेथे राहण्याचे नाकारले व आपले साधे ठिकाणचं पसंत केले” , असाही एक मत प्रवाह आहे. १५१३ ला कृष्णदेवराय ने आरंभ केला, त्यानंतर अच्युत व सदाशिवराव यांनी बांधकाम चालू ठेवले मात्र १५६५ च्या संहारानंतर ते थांबले. मंदिर पूर्ण झाले नाही व मूर्तीची प्रतिष्ठापना झाली नाही. त्यामुळेच या मंदिरात मूर्ती नाही व इथे कोणतीही पूजा विधी होत नसल्याचे ही सांगितले जाते.
शिलालेखानुसार :
मंदिरात एक शिलालेख असून त्याचा काळ १५१३ ते १५६४ चा आहे. या लेखावरून मंदिरात विठ्ठल मूर्ती होती, तिची पूजा अर्चा मोठ्या थाटाने होत असे निश्चितपणे सांगता येते. मग मंदिराचे बांधकाम पूर्ण असेल किंवा नसेल. उदाहरणार्थ शके १४३६ तील शिलालेखात असे म्हणले आहे की , कृष्णदेव व त्याच्या दोन राण्यांनी ९९१ पॅगोडा किमतीचे सोने, २५ चांदीचे दिवे, २०० गाई , ४ गावे विठ्ठल देवाच्या पूजेसाठी अर्पण केले. तसेच शके १४७६ शिलालेखात उदयगिरी तिम्म्म राजाने ६०० पॅगोडा वसुलीचे तिरुमलापूरम हे गाव मंडप उभारणी साठी दिले. या वरून तिथे मूर्ती होती हे स्पष्ट होते.
एवढ्या भव्य व अप्रतिम मंदिरात आज विठ्ठलाची मूर्ती नाहीय , येथे कोणतेही धार्मिक पूजा अथवा कार्यक्रम होत नसल्याची खंत होते. निर्मात्यांनी जीव ओतून निर्माण केलेल्या या मंदिराची अवस्था मनाला अस्वस्थ करणारी आहे. अनेक आक्रमणात ही कला काही प्रमाणात टिकली व आपल्याला ती आत्ता काही प्रमाणात पाहू शकतो हेच भाग्य समजायचे .
सविस्तर माहिती करिता जरूर वाचा :
१) वैभवशाली विजयनगर साम्राज्य – एन. शहाजी
२) विजयनगर हृदयस्थ साम्राज्य – डाॅ. अस्मिता हवालदार
३) मराठी विश्वकोश
४) सफर हंपी बदामाची – श्री आशुतोष बापट
५) A Forgotten Empire ( Vijayanagar ) – Robert Sewell
६)विजयनगर स्मारक ग्रंथ- भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे
७)विजयनगर उदयास्त- जयंत कुलकर्णी
Santosh Chavan