हंपीचं विरुपाक्ष मंदिर –
माणूस हंपी पाहायला आला की तो प्रथम विरुपाक्ष मंदिरात जातो. विरुपाक्ष म्हणजे शंकराचं एक रूप.
पुराणात त्याबद्दल धमाल कथा आहेत. ‘पम्पा’ ही ब्रह्माची मानसकन्या. हंपीच्या हेमकुटा पर्वतावर ती तप करायची. तिथेच काम देवाचा नाश करून शिव ध्यानस्थ बसला होता. शिवाचं ध्यान भग्न करण्यासाठी प्रेमाच्या देवाला, कामदेवाला पाठवलं होत. पुढे शिवाचं आणि त्या पम्पाचं लग्न झालं. ही पंम्पा म्हणजे आपली पार्वती. म्हणजे शंकर हा ‘पंम्पापती’ ठरला. त्याला विरुपाक्ष म्हटलं गेलं. विरुपाक्ष म्हणजे तिरकस डोळय़ाचा (Oblique eyes) देव. तो काळ किती चांगला होता नाही? शंकराला तिरकस डोळय़ाचा म्हटलं म्हणून कुणाच्या भावना दुखावल्या नाहीत. खुद्द शंकराचया
सुद्धा नाही. अशामुळे चिडून शंकराने तांडव केल्याचं वाचनात नाही. त्या काळी देवाला जात वगैरेही नव्हती. असलीच तर देव हीच जात. देव दलित, जाट, जैन वगैरे कुणी नसे. देव हा देव असे…
तर या विरुपाक्षाचं देखणं देऊळ हम्पीत आहे. आजही पूजाअर्चा सुरू असलेलं हे तिथलं एकमेव देऊळ आहे. ‘इतर मंदिरात पूजाअर्चा का नाही?’ या माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना सरकारी शिक्षित गाईड असं म्हणाला की ‘विजयनगर जेव्हा लुटलं गेलं, तेव्हा अनेक मूर्ती भंगल्या. भंगलेल्या मूर्तींची पूजा करत नाहीत. त्यामुळे ती मंदिरं आता फक्त पर्यटनस्थळं झालीएत. हे मंदिर वाचलं.’
माझा पुढचा प्रश्न नैसर्गिकपणे होता, ‘हे मंदिर कसं वाचलं.’
तो म्हणाला, 1565 मध्ये जेव्हा मुस्लिम राजांनी विजयनगर उद्ध्वस्त करून लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या सैन्यातल्या काही मराठय़ांनी राजाला विनंती केली की, हे मंदिर आमच्यासाठी सोडा. ते उद्ध्वस्त करू नका. सुलतानाने ऐकलं.
मला याचा उल्लेख कुठेही मिळाला नाही. 19व्या शतकात या मंदिराची डागडुजी केली गेली. ती कुणी केली. त्याचा ऐतिहासिक पुरावा काही नाही. पण ती इंग्रजांनी केली असावी असा कयास आहे. कारण एक म्हणजे अशा गोष्टी जतन करायच्या असतात याची जाणीव त्यांनाच होती. दुसरं म्हणजे मंदिरात एक-दोन ठिकाणी चक्क ब्रिटिश ठसा दिसतो. तलावाजवळच्या एका गोपुराजवळ वर चक्क इंग्लंडच्या राणीची मूर्ती आहे आणि मंदिरातल्या मंडपावरच्या छताच्या पेंटिंगमध्ये, चर्चमध्ये दिसतात तसे पंख फुटलेले लहानगे एंजल्स दिसतात. पण हे मंदिर टिकलं हे महत्त्वाचं. कारण ते एका देदीप्यमान साम्राज्याचं साक्षीदार आहे.
आपण गोपुरातून मंदिराच्या आवारात प्रवेश करतो. गोपूर म्हणजे पिरॅमिडसारखं शिखर. खाली ग्रॅनॅइट आणि वर विटा आणि प्लास्टरने तयार केलेलं नक्षीकाम. हे त्याचं स्वरूप! 11व्या आणि 12व्या शतकातल्या तामीळ देवळावरून या गोपुराची रचना केलेली आहे. या गोपुराच्या वर एक सोनेरी कळस आहे. पिरॅमिडसारख्या टोपीत सोनेरी पिस खोवले जावे तसा तो दिसतो. गोपुरातून आत गेलो की आयताकृती पटांगणात आपण पाऊल ठेवतो. चारी बाजूला मोठय़ा भिंती आहेत. तिथून देवळात जायला एक छोटं गोपूर आहे. ते विजयनगरच्या साम्राज्याच्या काळातलं आहे. 1510 साली कृष्णदेवरायाच्या राज्याभिषेकाच्या वेळी ते उभारलं गेलं. अर्थात स्टाईल तशीच, तामीळ मंदिराकडून उसनी घेतली गेली. त्याच काळात देवळात मंडप बांधला गेला. त्याचे स्तंभ (Colomns) खासच आहेत. अख्खा कॉलम खोदून त्यात जागा केल्या गेल्या आहेत. आणि चार छोटे कॉलम्स त्यातून तयार होतात. साधारण आपण देव ठेवतो त्या मखराप्रमाणे. हे विजयनगरच्या स्थापत्यकलेचं अपत्य आहे. मंडपाचे खांब हे ‘याली’ प्राण्यासारखे दिसतात. ‘याली’ हे एक पौराणिक जनावर आहे. त्याला बायोलॉजिकल पुरावा नाही. अनेक देवळांच्या खांबावर ते कोरलेलं दिसेल. किंबहुना हे खांबच बऱयाचदा यालीचं रूप घेतात. अर्धा सिंह, अर्धा हत्ती, अर्धा घोडा वगैरेचं एकत्रीकरण केलेलं असतं. कधी कधी त्याला पक्ष्य़ाचे अवयव असतात. त्याला वाघाचे सुंदर शरीर असतं. पण सिंहाचं डोकं, हत्तीचे सुळे आणि सापाची शेपूट वगैरे! हे जनावर मगरीच्या पाठीवर उभं राहिलेलंसुद्धा दाखवलं गेलंय.
दाक्षिणात्य स्थापत्य शास्त्रात ते आढळतं आणि विजयनगराच्या कालखंडात म्हणजे 16व्या शतकात अनेक मंदिरात या विचित्र प्राण्याने खांबाचं रूप घेतलं. या विरुपाक्ष मंदिराच्या मंडपात या प्राण्यावर योद्धा स्वार झालेलाही दाखवलाय. त्या काळातल्या कलावंताची कल्पनेची भरारी केव्हाही मोठी होती हे जाणवतं. या मंडपाच्या छतावर रंगीत पेंटिंग्ज आहेत. त्या चित्रांमध्ये शंकर-पार्वती, राम-सीतेचं लग्न दाखवलंय. राक्षसांवर रथातून शरसंधान करणारा शंकर आहे. ध्यानस्थ शंकरावर बाण सोडू पाहणारा कामदेव आहे. इथे विद्या नारायणाचंही चित्र आहे. ज्या हरिहर- बुक्कांनी विजयनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली त्यांचे हे गुरू. त्यांना पालखीतून सैनिक घेऊन येतायत असं दाखवलंय. पण त्या चित्रात जे दिसतं त्यामुळे जाणवतं की काही मूळ चित्रं तशीच ठेवून त्याची डागडुजी ब्रिटिशांनी केलीय. कारण त्या विद्याचरणाच्या चित्रात जे सैनिक दाखवले आहेत त्यांचे कपडे आणि त्यांच्या हातातल्या बंदुका दर्शवितात की हे चित्र 19व्या शतकातलं आहे. कारण विजयनगरच्या साम्राज्याच्या वेळी बंदुका कुठे होत्या? इथेच बायबलमध्ये छोटे एंजल्स पाहायला मिळतात. किंचित चुका करून किंवा त्यांची संस्कृती त्यात मिठासारखी मिसळून जरी कुणाला हे भग्नावस्थेत जाऊ शकणाऱया मंदिराचं पुनरुज्जीवन करावंसं वाटलं असेल तर ते कौतुकच आहे. त्यामागे कुठलाही धार्मिक व्यभिचार करण्याचा प्रयत्न नाही. तरीही त्या काळातल्या अति धार्मिकांनी हे मंदिर वाळीत टाकायचं ठरवलं होतं. पण इतरांचं शहाणपण जागृत होतं.
मध्य युगाचा विचार केला तर संस्कृती कुठलीही असो म्हणजे ख्रिस्ती, मुस्लिम, ज्यू किंवा हिंदू, चर्च, मशीद, मंदिरात जी जी कला सादर झालीय. मग ती शिल्पाच्या रूपात असो, पेंटिंग्जच्या किंवा मूर्तिकलेच्या. त्या त्या संस्कृतीतल्या पुराणाचा त्यावर प्रभाव दिसतो. त्याबरोबर त्या काळातलं समाजजीवन, सण-पोशाखापासून त्यांच्या शारीरिक संबंधांपर्यंतच्या सर्व बाबी जाणता येतात. ही शिल्पं ही चित्रं, त्या मूर्ती या त्या काळातल्या समाजजीवनाची आणि राजकीय घडामोडींची माहिती पुरवणारी लायब्ररी आहे. फक्त ही असंख्य पुस्तकं आपल्याला वाचता यायला हवी. मला ही पुस्तकं वाचायला आवडतात म्हणून मी जातो. आणि केवळ हौस म्हणून तुम्हाला मोठय़ाने वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मनात एक सुप्त इच्छा असते की या वाचनाची गोडी तुम्हालाही वाटावी.
द्वारकानाथ संझगिरी