विरुपाक्ष मंदिर हम्पी –

‘पम्पा’ ही ब्रह्माची मानसकन्या. तीने महादेव पती म्हणून मिळावा यासाठी तपश्चर्या केली पण महादेव देखील तपश्चर्येत होते. त्यांची तपश्चर्या भंग व्हावी म्हणून पार्वतीने इंद्राची मदत मागितली. इंद्राने ह्या कामासाठी कामदेवाला पाठवले, पण झाले उलटेच. महादेवाला भयंकर राग आला आणि त्यांनी स्वतःचे तिसरे नेत्र उघडून कामदेवाला भस्म करून टाकले. थोडक्यात हा प्रयत्न फसला. त्यामुळे आता महादेवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने त्यांच्यासारखेच विरक्त आयुष्य जगायला सुरू केले आणि इथूनच जवळ असणाऱ्या हेमकुंटा पर्वतावर तपश्चर्या सुरू केली. अनेक वर्षांनंतर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिचा स्वीकार केला. ही पंम्पा म्हणजे आपली पार्वती. म्हणजे शंकर हा ‘पंम्पापती’ ठरला. त्याला विरुपाक्ष म्हटलं गेलं. विरुपाक्ष म्हणजे तिरकस डोळ्यांचा  देव. पंम्पा हे संस्कृत नाव कन्नडा मध्ये येताना हंपा झालं आणि ज्या जागी महादेवाने पार्वतीचा स्वीकार केला ती जागा म्हणजे हम्पी!

तर या विरुपाक्षाचं देखणं देऊळ हम्पीत आहे. आजही पूजाअर्चा सुरू असलेलं हे तिथलं एकमेव मोठं देऊळ. विजयनगर जेव्हा लुटलं गेलं, तेव्हा अनेक मूर्त्यांची तोडफोड झाली. भंगलेल्या मूर्तींची पूजा करत नाहीत. त्यामुळे इतर अनेक मंदिरं आता फक्त पर्यटनस्थळं होऊन राहिलीत. हे मंदिर वाचलं.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य गोपुर आहे.   गोपुरातून आत गेलो की आयताकृती पटांगणात आपण पाऊल ठेवतो. चारी बाजूला मोठय़ा भिंती आहेत. तिथून देवळात जायला एक छोटं गोपूर आहे. ते विजयनगरच्या साम्राज्याच्या काळातलं आहे. 1510 साली कृष्णदेवरायाच्या राज्याभिषेकाच्या वेळी ते उभारलं गेलं. त्याच काळात देवळात मंडप बांधला गेला. त्याचे खांब खासच आहेत. या खांबांवर जागोजागी व्याल शिल्प कोरलेले आहेत. किंबहुना हे खांबच बऱ्याचदा व्यालाचं रूप घेतात. अर्धा सिंह, अर्धा हत्ती, अर्धा घोडा वगैरेचं एकत्रीकरण केलेलं असतं. या मंडपाच्या छतावर रंगीत पेंटिंग्ज आहेत. त्या चित्रांमध्ये शंकर-पार्वती, राम-सीतेचं लग्न दाखवलंय. राक्षसांवर रथातून शरसंधान करणारा शंकर आहे. ध्यानस्थ शंकरावर बाण सोडू पाहणारा कामदेव आहे. इथे विद्यानारायणाचंही चित्र आहे. ज्या हरिहर- बुक्कांनी विजयनगरच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली त्यांचे हे गुरू. त्यांना पालखीतून सैनिक घेऊन येतायत असं दाखवलंय. पण त्या चित्रात जे दिसतं त्यामुळे जाणवतं की काही मूळ चित्रं तशीच ठेवून त्याची डागडुजी ब्रिटिशांनी केलीय. कारण त्या विद्यानारायणाच्या चित्रात जे सैनिक दाखवले आहेत त्यांचे कपडे आणि त्यांच्या हातातल्या बंदुका दर्शवितात की हे चित्र 19व्या शतकातलं आहे. कारण विजयनगरच्या साम्राज्याच्या वेळी बंदुका कुठे होत्या?

साधारणतः सातव्या शतकापासून या मंदिराचे दाखले मिळतात. म्हणजे हंपीची ओळख विजयनगर साम्राज्य म्हणून होत असली तरी आधीच्या चालुक्य, होयसळ साम्राज्यांपासून येथे वस्ती आहे. आणि हम्पी हे तीर्थक्षेत्र असल्याचे सांगितले जाते ते याच मंदिराच्या प्राचिनत्वामुळे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *