विजय विठ्ठल, हंपी –

कर्नाटकातील ही छोटी विठ्ठल मुर्ती मराठी माणसासाठी अस्मितेचे मोठे प्रतिक आहे. विजय नगरहून भानुदास महाराज (एकनाथांचे पणजोबा) यांनी विठ्ठल मुर्ती पंढरपुरला आणली अशी दंतकथा आहे. पण कर्नाटकांत हंपी येथे प्रचंड मोठे असे जे विजय विठ्ठल मंदिर आहे तिथे मात्र आता कुठलीच मुर्ती नाही. या मंदिर परिसरात जो अतिशय सुंदर दगडी रथ आहे त्यावर ही विठ्ठल मुर्ती कोरलेली मला आढळली. विठ्ठलाचा हा एक पुरावा. या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे खाली जी चाकं दिसत आहेत ती संपूर्ण फिरत होती. लोक सारखं फिरवून नुकसान करायला लागले म्हणून दगड लावून चाकांना स्थिर केले आहे. विठ्ठल भोळ्या भक्तांचा साधाभोळा देव आहे असं म्हणतात. पण इथे मंदिराचे प्रचंड मोठे आवार पाहून विठ्ठलाची “श्रीमंती” डोळ्यात भरते. मराठी माणसांनी पंढरपुर सोबत हंपीच्या विठ्ठल मंदिराची यात्रा केली पाहिजे. आपल्या विठ्ठलाचे ऐश्वर्य डोळे भरून बघितलं पाहिजे. साध्या पालखीतून आपण दिंड्या घेवून पंढरपुरला जातो पण याच आपल्या विठ्ठलाचा रथ किती राजेशाही होता हे बघितलं पाहिजे.

पंचेवीस तीस फुटीं उंच सलग असे दगडी खांब आणि तसलेच आडवे बीम वापरून जी भव्यता हंपीच्या मंदिरांना आलेली आहे ती विलक्षण आहे. अन्यथा इतक्या लांबीचे दगड कुठल्या जुन्या मंदिरामध्ये वापरलेले आढळत नाहीत. मंदिरातला गरूड खांब, हा भव्य रथ विठ्ठल विष्णुचाच अवतार समजला जातो याचा पुरावा दाखवतो. रथयात्रा ही प्रामुख्याने वैष्णव देवतांची निघते. महाराष्ट्राने पालखी हा रथाला शोधलेला वेगळा वैशिष्ट्यपूर्ण पर्याय आहे का? याचाही शोध घेतला पाहिजे. विठ्ठल हे दैवतच मुळात सनातन धर्मातील एक क्रांती आहे असं जाणवतं. या दैवतेला वाहन नाही, हीच्या हातात शस्त्र नाही, ही दैवता कोप पावून कुणाला शाप देत नाही की वरदान देत नाही. पुंडलीकाने फेकलेल्या वीटेवर कटीवर हात ठेवून उभी आहे. त्यामुळे भजनात रमलेला तुळशी माळ घातलेल्या वारकर्‍याच्या भोळ्या भक्तीत बुडालेला विठ्ठलच आपल्याला जवळचा वाटतो. विजयनगरचा विजय विठ्ठल अंतराने आणि रूपानेही दूरचा भासतो. आपल्याला काळ्या पाषाणातील विठ्ठलाचे “सावळे सुंदर” रूप पहायची सवय. त्यामुळे हा विठ्ठल वेगळा वाटतो. कुठे संगमरवरी दगडांत कुणी विठ्ठलाची मुर्ती घडवली तर मला नाही वाटत ती मराठी माणसाला आपलिशी वाटेल म्हणून. बहिणाबाईंनी त्यामुळेच लिहून ठेवलंय

सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्‍याचा विठोबा
पाना फुलांतच राजी

रा.चिं. ढेरे सारख्या अभ्यासकाने मांडले की पुरीचा जग्गनाथ, तिरूपतीचा बालाजी आणि पंढरपुरचा विठोबा ही मुळची लोकदैवतं नंतर विष्णुचे अवतार म्हणून स्विकारली गेली. जग्गनाथ “अन्नब्रह्म”, बालाजी “कांचनब्रह्म” तर विठ्ठल “नादब्रह्म” मानल्या जातो. तुळशीमाळ गळ्यात घातलेला विठ्ठल आर्तपणे आळवलेल्या भजनानेच संतुष्ट होतो.

श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *