वीरगळ आणि महाभारत

आपला इतिहास किती वर्ष जुना असावा? शे दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट गप्पांच्या ओघात आपण कालच घडून गेल्यासारखी सांगतो. अर्थात ज्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्यासमोर शंभर दीडशे वर्षे म्हणजे काहीच नाहीत. पण, आपण जसे गोष्टींच्या मुळाशी म्हणजे down the rabbit hole जातो, तसे अगदी अलीकडची गोष्ट ही पार पल्याड जाऊन भिडते. उदाहरण म्हणजे वीरगळ. साधारण पाचव्या शतकापासून आपल्याला वीरगळ दिसू लागतात. महाराष्ट्र व कर्नाटकात प्रामुख्याने आढळणाऱ्या ह्या वीरगळ तीन मजल्यात विभागल्या असतात.

१. सर्वात खाली, विरास कोणत्या कारणाने हौतात्म्य मिळाले त्याचे अंकन.
२. मधल्या भागात, युद्धात वीरमरण आल्याने त्यास अप्सरा स्वर्गात घेऊन जात असतानाच अंकन,
३. व सर्वात वरती तो वीर त्याच्या भगवंताची स्वर्गात जाऊन पूजा करत असतानाचे अंकन…
ही अशी साधारण रचना दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का, की ह्याचा संदर्भ थेट महाभारताशी भिडतो?

कर्णपर्वात युधिष्ठिरास पराभूत केल्यानंतर कर्णाने न भूतो न भविष्यती असा नरसंहार सुरु केला. त्याचे अत्यंत प्रलयंकारी, बीभत्स वर्णन श्री वेदव्यासांनी महाभारतात केले आहे. ते लिहितात, त्या वेळी एकमेकांवर हल्ला करणाऱ्या उत्तमोत्तम योद्ध्यांच्या बाणांच्या वर्षावामुळे आकाशातील मेघांसारखी सावली पृथ्वीवर पडू लागली. शस्त्रास्त्रांनी आच्छादलेले अनेक जखमी राजे ध्वज- छत्रविना रणांगणावर पडले होते. सारथी , शस्त्रे , दागिने , तुटलेले आणि अस्ताव्यस्त पडलेले हजारो घोडे ह्यांचा खच त्या संघर्षात रणांगणावर पडू लागला. असंख्य योद्धे, हत्ती आणि रथ जणू त्या रणांगणावर चिरविश्रांती घेत झोपले होते. त्यांची शस्त्रे आणि शरीराचे अवयव छिन्नविछिन्न होऊन इतस्ततः विखुरले गेले होते. अशा रीतीने हत्ती, घोडे आणि सैनिकांनी उडवलेल्या धुळीने संपूर्ण परिसर झोकाळून गेला, स्वत:च्या आणि शत्रूपक्षाच्या योद्ध्यांनी आपल्याच लोकांना कापायला सुरुवात केली. धरेवरील मर्त्य पराक्रमी मानवांचा हा भयानक असा नरसंहार पाहण्यास आकाशात अप्सरांची एकच गर्दी झाली. आणि मग,

हतानभिमुखान् वीरान् वीरैः शतसहस्रशः ।
आरोप्यारोप्य गच्छन्ति विमानेष्वप्सरोगणाः ।।
तद् दृष्ट्वा महदाश्चर्यं प्रत्यक्षं स्वर्गलिप्सया ।
प्रहृष्टमनसः शूराः क्षिप्रं जघ्नुः परस्परम् ।।

– अप्सरा त्यांच्यासमोर लढताना मारल्या गेलेल्या लाखो योद्ध्यांना विमानात बसवून स्वर्गात घेऊन जाऊ लागल्या. हा महान चमत्कार प्रत्यक्ष पाहून आनंदाने आणि उत्साहाने भरलेल्या योद्ध्यांनी स्वर्गाच्या लालसेपोटी एकमेकांना शीघ्रतेने मारायला सुरुवात केली. हे वर्णन आपल्या वीरगळांच्या मध्य-भागाशी एकदम जुळते. महाभारताचा रचना काळ सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा, आणि त्याचा संबंध 5व्या शतकातील वीरगळांशी असा काहीसा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *