वीरगळ म्हणजे काय?-
वीरगळ म्हणजे काय? तर युध्दात कामी आलेल्या वीरांसाठी, गोरक्षण करतांना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणजे वीरगळ. वीरगळ हा शब्द ‘वीरकल्लू- वीरकळ- वीरगळ’ याप्रकारे महाराष्ट्रात रुढ झाला. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. कल्लू’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘दगड’ असा होतो. दक्षिणेत वीरगळास ‘वीरकळ’ तर उत्तरेत ‘वीरब्रम्ह’ म्हणतात. इंग्रजीत वीरगळास Herostone असे संबोधतात. वीरगळ हा शब्द पुल्लिंगी आहे. अभ्यासकांच्या मते वीरगळ दुसऱ्या ते अठराव्या शतकादरम्यान बनवले गेले. त्यांचे मूळ कर्नाटकात आहे. कर्नाटकातील वीरगळींवर शिल्राल्लरेख असल्याने त्यांचा इतिहास समजतो.
महाराष्ट्रातील काही वीरगळींवर मात्र शिलालेख आढळत नाही. त्यामुळे वीरगळमधील वीराचे नाव, त्याच्या मृत्युची तिथी, युद्धप्रसंग याबाबत इतिहास मुक आहे. वीरगळ अभ्यासताना त्यावर शिल्रालरेख नसल्याची उणीव नेहमी भासते. यामुळे बऱ्याच वीरांचा इतिहास अंधारात राहिला. असे असले तरी वीराच्या वेशभूषेवरुन अंदाज लावता येतात. वीरगळमधील वीरच्या डोक्यावर मावळी पगठ्ठी असेल तर वीरगळ यादवकाळानंतरची समजावा. यादवकालीन वीरगळान्वर सुंदर कोरीव काम असते. उत्तरार्धात उभारलेल्या वीरगळान्मधे जास्त रेखीवपणा आढळत नाही.
वीरगळावर फ़ार कमी प्रमाणात शिलालेख आहेत. त्यामुळे वीरगळ पाहून त्यातील वीर कोण आहे, कुठल्या युध्दात तो कामी आला आणि वीरगळाचा निर्माता कोण आहे हे सांगता येत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. बोरीवलीतील एकसार भागात असलेल्या वीरगळीवर शिलाहार राजा सोमेश्वर आणि यादव राजा महादेव यांच्यात झालेले नौकायुध्द कोरलेले आहे. अशाप्रकारे नौका युध्द कोरलेली महाराष्ट्रातील ही एकमेव वीरगळ आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर असलेल्या मठ गावात असलेल्या सावंतांच्या वीरगळी आहेत त्यावर शिलालेखही कोरलेले आहेत. या शिलालेखात वीरगळींचा उल्लेख भडखांब म्हणून केलेला आहे.
वीरगळ हा आयताकृती दगडावर कोरलेला असतो. या दगडावर १,२,३ किंवा ४ चित्र (शिल्प) चौकटी कोरलेल्या असतात.
सर्वात खालच्या चौकटीत ज्या कारणामुळे योध्याला वीर मरण आले ते शिल्पांकीत केलेले असते. यात वीर युध्द करतांना, गोधनाचे रक्षण करतांना, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करताना दाखवलेला असतो. युद्षप्रसंगात वीर व त्याच्याविरुद्ध लढनारे शत्रु यांची शिल्पे दिसतात. वीरांची वेशभूषा, शत्रुसंख्या, सर्वांच्या हातातील शस्त्रे यांचे निरिक्षण करावे. पायदळ, घोडदळ, गजदळ, नोकायुद्ध, दंदयुद्ध यांसारखे विविध युद्धप्रकार आढळतात.
दुसऱ्या चौकटीत तो अप्सरांबरोबर दाखवलेला असतो. याचा अर्थ अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत तो स्वर्गसुख उपभोगत आहे असा होतो. याला कैलासारोहण म्हणतात. धारातीर्थी पडलेल्या वीराला अप्सरा कैलासात नेत आहेत, या आशयाचे शिल्प असते. वीर नेहमी मध्यभागी असतो. वीरासोबत जितक्या जास्त अप्सरा, तितका तो वीर मोठ्या पदावरचा समजावा. काही ठिकाणी वीराला पात्रखीचाही मान मिळतो.
त्यापुढील तिसर्या चौकटीत ब्राम्हण/ साधू पूजा सांगत आहे आणि वीर एकटा किंवा सपत्नी शंकराच्या पिंडीची पूजा करतांना पाहायला मिळतो. याचा अर्थ त्याने केलेल्या पूण्य कर्मामुळे तो देवाशी एकरुप झालेला आहे. त्याला मोक्ष मिळालेला आहे. काही वीरगळान्मधे वीर – फक्त शिवल्रिंग, काहींमधे नंदीवरील शिवलिंग पुजताना दाखवतात. काहींमधे तर वीराला प्रत्यक्ष भगवान शिव पूजनाचा मान मिळतो. वीराच्या अधिकारपदानुसार ही विविधता आढळते.
वीरगळीचा सर्वात वरचा भाग म्हणजे शिखर. काही वीरगळान्मधे शिखर आढळत नाही. शिखरामधे विविध शिल्पे- शुभलक्षणी चिन्हे कोरलेली असतात. येथे कलशासोबत पक्षी कोरले असतील तर त्यास कलशवाहक व प्राणी असतील तर त्यांना कलशसंरक्षक म्हणतात. याशिवाय येथे चंद्र-सूर्य, किर्तीमुख, कमळपुष्प यांसारखी शिल्पे आढळतात.
काही विरगळवरती पिंड, मंगल कलश आणि त्याच्या एका बाजूला चंद्र आणि दुसर्या बाजूला सूर्य कोरलेला असतो. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र असे पर्यंत या वीराची किर्ती आसमंतात राहील. वीरगळींच्या चित्र चौकटींच्या वरच्या भागात कलशा व्यतिरीक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात. वीर कोणत्या धर्माचा (हिंदू, जैन बौध्द), कोणत्या पंथाचा (शैव, वैष्णव इत्यादी) उपपंथाचा असेल त्याप्रमाणे शिल्पांकन बदलत जाते. वीर वैष्णव पंथी असल्यास विष्णू, गाणपत्य पंथीय असल्यास गणपती, बौध्द असल्यास स्तुप पाहायला मिळतो.
वीरगळीसाठी वापरला जाणारा दगड, त्यावरील कलाकुसर या गोष्टीही खर्चिक असल्याने जवळपास उपलब्ध होणारा दगड वापरुन कमीत कमी कलाकुसर केलेल्या वीरगळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याउलट एकसारच्या वीरगळी राजाने त्याच्या विजया निमित्त उभारल्यामुळे त्यासाठी बाहेरुन आणलेला उत्कृष्ट दगड, त्यावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते.
युद्धात धारातीर्थी पडलेल्या किंवा परकीय आक्रमकांपासून गावचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्यांचे स्मारक म्हणजे वीरगळ. पण आज त्यांचीं ओळख हरवली आहे. शुरवीरांच्या पराक्रमगाथा सांगत असलेले हे स्मारक आज मात्र काहीसे दुर्लक्षित आहे. ते कुठेतरी महादेवाचे मंदिर, ग्रामदैवत किंवा गावकुसाबाहेर दुर्लक्षित व भग्न अवस्थेत दिसतात. काही ठिकाणी तर देवाचे दगड म्हणून पूजले जातात. बहुतांश वीरगळान्ना शेंदुर फासल्याने त्यांची झिज होते. सतिशिळा आणि गद्वेगळ यांचीही तीच अवस्था. अज्ञात वीरांच्या स्मारकांची ही अवस्था म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमानचं आहे!
विरगळींची अशी उपेक्षा थांबवली पाहिजे. त्यांना त्यांचीं हरवलेली ओळख मिळवून देने, त्याबाबत जनजागृती करने ही आपल्ली जबाबदारी आहे. अस्तव्यस्त पडलेल्या वीरगळ त्यांना ऊन वारा पाऊस लागणार नाही, अश्या ठिकाणी ठेवाव्यात. त्यामुळे त्यांचीं झिज थांबेल. शक्य झाल्यास वीरगळबाबत माहिती देणारा बोर्ड तिथे लावावा. पुरातत्व खात्याकडे वीरगळ नोंदणीचे फॉर्म मिळतात. त्यामार्फत वीरगळ नोंदणी करावी.