लढाई निदर्शक वीरगळ!!!
प्राचीन काळी राजेशाही होती. त्यामुळे साम्राज्यविस्तार, राज्यरक्षण, परचक्र या कारणांतून लढायांना तोंड फुटत असे. लढाई हा प्राचीन व मध्ययुगीन जीवनाचा स्थायीभाव असल्यामुळे सातत्याने लढाया होत असत. दोन्ही बाजूच्या लष्करातील बरेचसे शूर पराक्रमी वीर धारातीर्थी पडत असत. ज्या ज्या गावातील, राज्यातील जे वीर धारातीर्थी पडत असत, प्रस्तुत त्या गावी त्यांची स्मारकशिळा उभी केली जात असे. यातून लढाई निदर्शक वीरगळाची निर्मिती होत असे. त्यात कुणाचा हुद्दा लहानमोठा असे. लढाई निदर्शक वीरगळ निर्मितीच्या पाठीमागे विविध कारणे असत. लढायांचे विविध प्रकार, विविध पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी विविध आयुधे शस्त्रे, हत्ती, घोडे, पायदळ, रथदळ यांवरून प्रत्येक लढाईचा वेगळेपणा स्पष्ट होत असे. वीरगळामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या कप्प्यात हे शिल्पांकित केलेले असते. लढाईचे वेगवेगळे प्रकार व कारणे यांतून लढाईच्या प्रकारानुसार वीरगळ तयार केले जात.
पायदळाची लढाई
बहुतांशी वीरगळावरती हा प्रकार असतो. वीरगळावर पायदळाच्या लढाईत अनेक प्रकारचे वैविध्य असते. बहुतेक ठिकाणी दोन वीर एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात. किंवा एका वीरासमोर दोन किंवा तीन वीर लढाई करताना दिसतात. तर काही वेळा ४, ५ वीरांचा समूह असतो. वीर हा इतरांपेक्षा थोडा मोठा दाखवलेला असतो. त्याचा मान व पराक्रम तेवढा मोठा असतो. वीराच्या हातात बहुतेक वेळा ढाल व तलवार असते. तर काही वेळा भाले दाखवतात. तर काही वेळा धनुष्यबाणदेखील दाखवलेला असतो. काही वेळा बिचवा किंवा कट्यार किंवा काठीलाठी दाखवतात. तो वीर ही शस्त्रं घेऊन ४, ५ जणांबरोबर गावावरील परचक्र, गावाचे गोधन यांच्यासाठी लढत असतो. काही वेळा पायदळात दोन वीरदेखील लढताना दाखवतात. एक तर ते एकाच गावातले किंवा एकाच कुटुंबातले असावेत.
सदरील वीरगळ हा पायदळ लढाई निदर्शक वीरगळ असून याच्या शेवटच्या कप्प्यात विराचे वीरमरण दाखवले आहे .यात वीर लढाईत मृत झाला असून तो आडवा दाखवला आहे .त्या ठिकाणी वीराला स्वर्गात नेण्यासाठी स्वर्गातून अप्सरा हार घेवून आल्या आहेत .
त्याच्या वरील कप्प्यात वीराचे शत्रू बरोबर पायी लढाई चालू असून त्यात वीरांच्या हातात ढाल तलवार असून समोर दोन वीर शत्रू सैन्यात आहेत त्याकडे देखील ढाल तलवार असून ते युद्ध करीत आहेत .वीरांच्या मागे देखील वीराचा सहकारी हातात धनुष्य बाण घेवून लढत आहे त्यात मुख्य वीर मरण पावला आहे त्यावरील कप्प्यात स्वर्गप्राप्ती प्रसंग असून वीर स्वर्गात आपले आराध्य दैवत शिवाची पूजा करत असून नमस्कार मुद्रा आहे .स्वर्गाचा प्रतिनिधी म्हणून पुरोहित वीरास वेद मंत्राने सिद्ध करत आहे
त्याच्या वरती मंगल कलश असून तो मोक्ष प्राप्तीचा संकेत असतो .
@©अनिल दुधाणे