लेणीचे प्रकार आणि लेणीचे अंग–
लेण्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. लेणीचे प्रकार पुढीलप्रमाणे –
ऐहिक लेणी
– नाणेघाटात सातवाहनांचे देवकुळ म्हणजे कीर्तिमंदिर – पूर्वजांच्या प्रतिमांचे मंदिर. हे एकमेव लेणे ऐहिक लेणे म्हणून ज्ञात आहे.
धार्मिक लेणी
– बौद्ध, जैन, हिंदू.
बौद्ध लेणी मध्ये पण हीनयान व महायान या दोनही पंथांची लेणी आढळतात. हीनयान पंथाची लेणी जास्त पुरातन. त्यांत बुद्ध मूर्ती नसते. महायान पंथातील लेण्यात स्तूप, दागोबा वा बुद्धाची मूर्ती दिसते.
बौद्ध लेण्यात चैत्य व विहार हे दोन प्रकार दिसून येतात. चैत्य म्हणजे भिक्षूंचे प्रार्थनामंदिर व विहार म्हणजे त्यांचे निवासस्थान. चैत्यात मूर्ति, स्तूप किंवा दागोबा असतो. विहारात त्यांच्या निवासाची व्यवस्था. मोठ्या लेण्यात मध्ये चौक व भोवताली खोल्य़ा असतात तर लहान विहारात खोदून काढलेल्या खोल्या.
जैन लेण्यांमध्ये चैत्यगृह नाही फक्त विहार दिसून येते.
हिंदू/ब्राह्मणी लेण्यात चैत्यगृह आणि विहार ही दोन्ही नसतात. येथे आपल्याला देवतांच्या मूर्ति, शिवलिंग इ. पाहायला मिळतात. तसेच काही ठिकाणी रामायण-महाभारतातील, पुराणातील प्रसंगही दाखविलेले असतात.
लेणीचे अंग –
स्तूप – स्तूप म्हणजे पूज्य व्यक्तीच्या अवशेषांवर उभारलेला व दगड, माती, विटा यांनी बांधलेला किंवा खडकात खोदलेला बहिर्गोल वास्तुप्रकार होय. काही ठिकाणी याचा उल्लेख ‘डागोबा’, धातुगर्भ असाही होतो. स्तूपाच्या ढिगाऱ्याला अंड म्हणतात. ज्या पात्रात अवशेष असतात त्याला दागोबा म्हणतात. हीनयान पंथीय अनुयायांनी उभारलेले स्तूप ओबडधोबड व साधे असून महायान पंथीयांनी चैत्यगृहातील स्तूपाला शिल्पांनी अलंकृत करण्याचा आणि दर्शनी भागावर बुद्धाची मूर्ती कोरण्याचा प्रघात पाडला. काही स्तूपावर हर्मिका असतात. त्यावर एकावर एक अशी तीन छत्रे उभारलेली पाहायला मिळतात. महायान पंथाने बुद्धांच्या मूर्तीची पूजा सुरु करण्यापूर्वी साधक लोक स्तूपाची पूजा करीत असत. स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालता यावी यासाठी नंतर प्रदक्षिणा पथ बांधण्याचा प्रघात सुरु झाला. अमरावती, नागार्जुनकोंडा, बोधगया, भारहूत, मथुरा, सांची, सारनाथ येथील तोरणे शिल्पपट्टांनी अलंकृत आहेत. यांतील काहींची मोडतोड झाली आहे.
विहार – पाली भाषेत विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिक्खु वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. सुरुवातीस तिच्यात एकच दालन/खोली असे व त्यापुढे व्हरांडा असे. भिक्षूंची संख्या वाढल्यानंतर हळूहळू त्याचा विस्तार होऊन त्यात आणखी खोल्यांची/दालनांची भर पडली आणि मोठमोठे मंडप कोरण्यात येऊ लागले. त्याचबरोबर मंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींत खोल्या काढण्यात आल्या. मंडपांना आकारमानानुसार छताच्या आधाराकरिता काही अंतरावर समांतर असे स्तंभ कोरण्यात येऊ लागले. या स्तंभांना विविध वेलपत्तींनी, स्तंभशीर्षांनी, शिल्पांनी व चित्रांनी भूषविण्याची पद्धत पडली. कार्ले, नाशिक, अजिंठा व वेरूळ येथील मंडपांचे स्तंभ अलंकृत केलेले आहेत. सुरुवातीच्या विहारांत काढलेल्या आकृतींत बोधिवृक्ष, चक्र, पादुका इ. प्रतीकात्मक चिन्हांनी बुद्धाचे अस्तित्व सूचित केले आहे. महायान पंथाच्या उदयानंतर विहारात मूर्तिशिल्पाला महत्त्व प्राप्त झाले आणि जातककथांतून सांगितलेले बुद्धचरित्रातील अनेक प्रसंग शिल्पांकित करण्यात आले. यातूनच बुद्धाच्या वज्रपाणी, पद्मपाणी यांसारख्या सुरेख मूर्ती आकारास आल्या.
चैत्यगृह – चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. अनेक उपासकांना एकाच वेळी प्रार्थना, उपासना करण्याची सोय म्हणून चैत्यगृह बांधले जाई चैत्यगृहे विहारांच्या जवळपास आणि भिक्षूंना प्रार्थनेकरिता उपयुक्त होतील अशा पद्धतीने खोदलेली आहेत. त्यांना ‘गंधकुटी’ असेही म्हणतात. चिता किंवा चिती या संस्कृत शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे. चैत्य हे ठरावीक उंचीवर व ठरावीक दिशेवरच असतात. जेव्हा सूर्याचे किरण स्तूपावर पडतात तेव्हा उजाडायला लागते. बोगद्यासारख्या खोदलेल्या चैत्यगृहामध्येही अंधार नसतो. बुद्धमूर्तीसमोर विपश्यनेसाठी बसल्यावर साधनेमध्ये बाधा येऊ नये यासाठी, प्रकाश डोळ्यांवर नव्हे तर पाठीमागून पडावा याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली असते.
सुरुवातीची चैत्यगृहे चौकोनी, आयताकार असून त्यांच्या प्रवेशद्वारासमोर मागील भिंतीत चैत्य वा स्तूप कोरलेला असे. पुढे या भिंतींना अर्धवर्तुळाकार देण्यात आला. चैत्यगृहाच्या प्रशस्त आकारानुसार स्तंभांना दोन स्वतंत्र रांगा दोन्ही बाजूंस भिंतींशी समांतर कोरण्यात येऊ लागल्या आणि त्याबरोबरच चैत्य किंवा स्तूप मागील भिंतीपासून पुढे आणून प्रदक्षिणापथाची रचना अस्तित्वात आली. आत कोरलेल्या बुद्धमूर्तीवर प्रकाश पडावा, म्हणून या वास्तूत दर्शनी भिंतीवर जाळीसहित मोठी खिडकी-चैत्यगवाक्ष पाडण्याची प्रथा हळूहळू अस्तित्वात आली. ही अर्धवर्तुळाकार असल्याने ती घोड्याच्या नालाच्या आकाराची कमान असे. गौतम बुद्धाला अश्वत्थ वृक्षाखाली (बोधिवृक्ष) ज्ञानप्राप्ती झाली, म्हणून या चैत्यगवाक्षाचा आकार वास्तवात अश्वत्थ पानासारखा आहे. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते.
विहार व चैत्यगृहांजवळ भिक्षुंकरिता पाण्याची टाकी खोदली जाई. त्यास ‘पोढी’ म्हणत.