शिल्पकलेतील त्रिपुरांतक शिव –

आज कार्तिक स्नान समाप्ती आणि कार्तिक महिन्यातील ही पौर्णिमा. आजचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. कार्तिक महिन्यातील या पौर्णिमेच्या दिनानिमित्त अनेक पौराणिक संदर्भ आहेत. तसेच बौद्ध आणि शीख धर्मातही आजचा दिवस तसा महत्त्वपूर्ण दिवस आहे. त्रिपुर संहारा ची कथा महाभारतामध्ये वाचायला मिळते. तारकासुराची तीन मुले होती. विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष. या तिघांनी ब्रह्मदेवाची आराधना करून तीन अभेद किल्ल्यांचे स्वामित्व प्राप्त करून घेतले होते. यासोबतच असाही वर मिळून घेतला होता की, हे तीनही किल्ले त्यांच्या इच्छेप्रमाणे फिरत असतील. एक हजार वर्षात एकदाच ते एका सरळ रेषेत येतील आणि याच वेळी एकाच बाणाने हे तीन पूर नष्ट केल्या जाऊ शकतील. मयासूर या स्थापतीने सोने, चांदी व लोखंडाचे तीन किल्ले निर्माण करून दिले. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तीन पूर मिळविल्यानंतर हे तिन्ही बांधव बलवान होऊन देवांना छळण्यास प्रारंभ केला.

एक हजार वर्षानंतर जेव्हा ही तीनही पूर एकाच बिंदूवर येणार होती, त्यावेळी सर्व देवतांनी देवाधिदेव महादेव यांच्याकडे प्रार्थना केली की, हे तिन्ही पूर नष्ट करण्यास आपण पुढाकार घ्यावा. शिवाने या असुरांच्या नाशा साठी सर्व देवतांच्या शक्तीची मागणी केली. त्यानुसार देवतांच्या शक्तीच्या साह्याने हे तिन्ही पुर नष्ट करण्यास शिव सज्ज झाले. विष्णू, सोम, अग्नी आणि यम यांचा बाण निर्माण केला गेला. अग्नि यास बाणाची दांडी बनविले गेले, सोम बाणाचे शीर्ष झाला. तर स्वतः विष्णू बाणाचे टोक झाले. मेरू पर्वताचे धनुष्य निर्माण केल्या गेले. नागराज वासुकी यांची प्रत्यंचा निर्माण केली गेली. साक्षात पृथ्वीचा रथ केला, मंदार पर्वताचा अक्ष करून त्यास चाके म्हणून तेजोमय सूर्य आणि चंद्र बसविले गेले. रथाचे उपचक्र म्हणून पर्वतराज हिमालय आणि विद्याद्री यांची व्यवस्था केली गेली. सप्तऋषींना चाकावर गोलाकार बसविण्यात आले. गंगा, सरस्वती आणि सिंधू या नद्यांना चाकाच्या अक्षाच्या खिट्या किंवा पाचर बनविण्यात आले. रथाचे छत म्हणजे आकाश, चार वेद हे रथाचे चार अश्व झाले. नागराज कालपृष्ठ, नहुष, करकोटक आणि धनंजय हे अश्वाना बांधून ठेवणारे पट्ट झाले. यासोबतच कृती, सत्य, वैराग्य आणि ऐश्वर्य यांना घोड्याचे लगाम बनविले गेले. आणि त्यानंतर शिवाने हे तीनही पूर एकाच बाणात नष्ट केली. या समयी शिवाच्या रथाचे सारथ्य प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केलेले होते.

वेरूळच्या कैलास लेणीमध्ये त्रिपुरांतक शिवाचे अतिशय सुंदर शिल्प कोरलेले आहे. दक्षिण भारतामध्ये असे शिल्प मोठ्या प्रमाणात उपलब्ध असले तरी, वेरूळच्या कैलास लेणीतील त्रिपुरांतक मूर्ती ही वेगवान हालचाल करीत असलेली, अचूक शरसंधान, रथाची गतिमानता या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून शिल्पकाराने हे शिल्प घडविले आहे. प्रस्तुत शिल्पात शिवाने दोन्ही पायात अंतर ठेवून रथावर उभे असून स्वतःचा तोल सांभाळीत असल्याचे सहज जाणवते. शिवाची उभी राहण्याची ढब, आकर्ण खेचलेली धनुष्याची दोरी, शिवाच्या हाती कोरलेले आयुधे सारे काही उत्कृष्टपणे कोरली आहेत. शरसंधान करीत असताना शिल्पात बाण दाखविलेला नाही. याचा अर्थ धनुष्यातून बाण निघालेला आहे. शिल्पातील घटनाक्रम पाहता बाणाने आपले काम अचूक केले असल्याचे जाणवते. धनुष्य ओढून नुकताच बाण सोडला आहे. ज्यामुळे तीन पैकी एक पूर उध्वस्त झाल्याचं शिल्पात दाखवताना धनुष्याच्या खाली आकाशातून एक व्यक्ती पडताना कोरलेला असून हा पहिला पूर, असुर किंवा किल्ला आहे. रथातील गतिमानता स्पष्ट करण्यासाठी घोडे आणि रथ हे काटकोनात असलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात कोरून कलाकाराने हवे ते दृश्य साकार करण्यात यश मिळविले आहे.

बौद्ध धर्मातील मान्यतेनुसार, कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धाचा एक शिष्य धम्म सेनापती सरीपुत्राचे परीनिर्वाण झाले होते. त्यामुळे बौद्ध उपासक आणि उपासिका अष्टशिलांचे पालन व उपवास तसेच बुध्द वंदना करतात. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. अशा या तिन्ही धर्माच्या पवित्र दिनी आपणा सर्वास मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

फोटो Google

संदर्भ ग्रंथकर्त्याचे आभार

IRS & I – SARC

ओळख मूर्तीशास्त्राची – डॉ अरविंद सोनटक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *