शिव ते महादेव –

शिव हा अखिल भारतात सर्व जाती-जमातींचा पूज्य असा महादेव आहे. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव आणि इतर अनेक जाती-जमातींचे तत्सदृश्य देव यांचा गुणधर्म समन्वय होऊन संप्रदायांचा पौराणिक शिव आकाराला आला आहे. रुद्र शिव असे त्याचे संयुक्त रूप आहे. शिवाचे स्वभावधर्म रुद्राला लागू होतात. रुद्र अग्नी तत्त्वातून उगम पावल्यामुळे अग्निज्वाला उर्ध्वगामी असतात. त्या वरून रुद्राच्या ऊर्ध्व लिंगाची कल्पना केली गेली असावी. शिवलिंगाला ज्योतिर्लिंग म्हणतात त्याचे रहस्य हेच आहे. अग्नि वेदीवर जळत आणि तापत राहतो; म्हणून शिवरूपात त्याला शांत करण्यासाठी त्याच्या मस्तकी अभिषेकाची संततधार धरावी लागते. शिव किंवा शिवभक्त आपल्या शरीरावर भस्मचर्चन करतात त्यातही रुद्राचे अग्नीशी तादात्म्य सूचित होते.

रुद्राच्या घोर व अघोर अशा दोन तनु मांडलेल्या आहेत. यजुर्वेद आणि अथर्ववेदात रुद्राला मारक असे म्हटले आहे. तर यजुर्वेदात त्यास अघोर म्हणजे सौम्य रूप विशद केला आहे. भव आणि शर्व ही शिवाची दोन प्रसिद्ध नावे आहेत. या दोन्ही मुळात भिन्न देवता होत्या. शिवमहात्म्य वाढल्यावर या दोन्ही देवता शिवाच्या भूपती आणि पशुपती या स्वरूपात विलीन झाल्या. अशाप्रकारे अनेक देवतांना आपल्यात समाविष्ट करून शिव हा महादेव बनला.

या महादेवाची पुजा लिंगरूपात करावी असे पुराणांनी सांगितलेले आहे. ही लिंग पूजा फार प्राचीन असून तिचे अवशेष सर्व जगामध्ये आढळतात. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात ह्या गोष्टीचा पुरावा मिळालेला आहे. तिथे सापडलेल्या एका खापरावर एक त्रिमुख पूर्णाकृती उमटवलेली असून ती ऊर्ध्वमेंढर (उत्थित लिंग ) दाखवलेली आहे. सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा हा उपास्यदेव असावा आणि त्याची पूजा लिंगरूपात करीत असावेत हे तिथल्या अवशेषावरून कळून येते.

शाळुंका आणि त्यावर ऊर्ध्व लिंग आकृती ही दोन्ही मिळून लिंग प्रतिक बनते. शाळुंका हे योनी प्रतीक आणि ऊर्ध्व पाषाण हे लिंगप्रतीक समजावे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत होणारी स्त्री-पुरुषांची ही जननेंद्रिय सिंधू संस्कृतीच्या लोकांनी तसेच इतरही अनेक आदिम जमातींनी शिवलिंग स्वरूपात उपास्य बनवली. लिंगा बद्दल लिंगपुराणात सयोनी लिंगाचे वर्णन दिलेले आहे. लिंग वेदी अर्थात शाळुंका म्हणजे पार्वती व लिंग म्हणजे साक्षात महेश्वर होय. त्या दोघांच्या पूजनाने शिवपार्वतीची पूजा केल्यासारखे होते.

शिवलिंग निर्मिती कशी करावी याविषयी तपशील सुप्रभेदागम मध्ये दिलेला आहे.

लिंगे ही आदिम काळापासून भारतात दिसून येतात, जी नंतर शिवलिंगा सोबत जोडली गेली. श्रीपरीपूर्णानंद वर्मा म्हणतात की, जगाच्या कानाकोपऱ्यात वासना आणि प्रजनन या दोन कारणांमुळे लिंग पूजेचा प्रसार झाला होता. कटनर असे म्हणतात की, लिंग पूजा सर्वप्रथम इजिप्त देशात सुरू झाली. जी चौथ्या शतकापर्यंत टिकून होती. आयसीस याने लिंग पूजेचा प्रारंभ केला होता. आयसीसीच्या मंदिरातही अग्नि पेटत ठेवत असत. या अग्नीचे पूजन “अक्षतयोनि” कुमारिकाच करीत असत. यातही शिव संकल्पनेचे आदिम रूप आम्ही पाहू शकतो. शिवाचा आणि अग्नीचा असलेला सहसंबंध, त्याचे शिखी हे नाव, त्याचा अग्नीमुळे तिसरा नेत्र, शाश्वत प्रजनन शक्ती दर्शविणारा त्याचे ऊर्ध्व लिंग, काम दहनाचा केलेला पराक्रम. तसेच शिव ज्ञानस्वरूप असून काम दहन केले म्हणजे पार्वतीचे लैंगिक सुख हिरावून घेतले असे मात्र नाही. आपल्या ज्ञानाग्नीने अविद्या आणि अज्ञानरूपी तमांचा नाश केला असे म्हणता येईल.

शिवाने वैदिक परंपरेला असंख्य कथा दिल्या. रुद्र आणि योगिनी हे शिवाशी संबंधित आहेत. शिव हा योगापासून भोगा पर्यंत, सर्व शाखांचा उद्गाता, विषा पासून गांजा पर्यंत, कामापासून वैराग्य पर्यंत पुरुषोत्तमाचे सर्व बिंदू शिवा मध्ये आहेत.

वात्सायनाने कामसूत्र लिहीत असताना त्याचे सर्व श्रेय शिवाला दिलेले आहे. पहिल्यांदा काम कलाही शिवाने पार्वतीला सांगितली, ती नंदीने ऐकली. त्यावर नंदीने अनेक खंडाचा ग्रंथ लिहिला तो सामान्यांना वाचणे शक्य नसल्यामुळे त्याचे लघुरूप मी मांडत आहे असे मुनी वात्सायन म्हणतात. कालिदासाच्या कुमारसंभवात शिवपार्वतीच्या समागमाचे सविस्तर वर्णन मांडलेले दिसून येते.

शिव म्हणजे मंगल, रौद्र, सौम्य, संहारक, नवसर्जन, सुखनिधान, भयंकर & आशुतोष अशा रूपात आढळतो. सर्जक नसला तरी सर्जनाचे बीज धारण करणारा आहे. अमरकोशात शिवाची 48 नावे आहेत. या नावात त्याच्या रूपाची, लंच्छनाची, कार्याची माहिती देणारी आहेत. ऋग्वेद मधील रुद्र पुढे शिव झाले. हे शिवरूप लिंग पूजेच्या माध्यमातून समाजात स्थापित झाले. पुढे यातूनच कलामुख, लकुलिश, कपालिक, वीरशैव असे पंथ निर्माण झाले. यास तत्वज्ञानाची जोड होतीच. शिव दर्शनिक आणि लोकप्रचलित अशी दोन रूपे ही पहावयास मिळतात. तो योग्याचा परमपुरुष असून स्वतः ही महायोगी आहे. शिवपुरानातील अद्भुत आणि अलौकिक कथा त्याच्या संहारक आणि उपकारक कामाची माहिती देतात.

शिव गजासूरला मारतो तर मार्कंडेयला जीवदान देतो. दक्ष यज्ञ संपवितो तर जगाला वाचविण्यासाठी हलाहल प्राशन करतो. तपोभंग करणाऱ्या मदनाला जाळतो तर अर्जुनाचा, विष्णुचा अनुग्रह करतो. स्वर्गातून येणाऱ्या गंगेचा ओघ मस्तकी धारण करून वाट मोकळी करून देतो. अशा कितीतरी कथा सांगता येतील.

मूर्ती कलेत सदाशिव, गंगावतरण, स्त्री पुरुष समानता दर्शविणारी अर्धनारीश्वर, सामान्य लोकभावना प्रकट करणारी कल्याणसुंदर, वृषभवाहन, अंधःकासुर वध, रावणानुग्रह, लिंगोदभव, त्रिपुरानंतक, नृत्य शिव, भिक्षाटण शिव, गौरीहर, अष्टमुख, सोमस्कंद, चांडेशनुग्रह, महेशमूर्ती, एकादश रुद्र, बालशिव असे कितीतरी प्रकार आढळून येतात.

डॉ. अरविंद सोनटक्क
मूर्तीशास्त्र अभ्यासक,
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर जिल्हा नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *