गजासुर वधाचे अत्त्युत्कृष्ट शिल्प –

होयसळ राजवटीच्या मंदिरांमध्ये “भगवान शंकरानी केलेला गजासुर नामक राक्षसाचा वध” या कथेवरील आधारित अत्त्युत्कृष्ट शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. हा गजासुर म्हणजे महिषासुराचा पुत्र.  दुर्गादेवीने  महिषासुर राक्षसाचा वध केल्याचे पाहून त्याचा पुत्र गजासुर संतप्त झाला व आपण याचा सूड उगविण्यासाठी ताकदवान व्हायला हवे या विचाराने त्याने ब्रह्मदेवाचे तप आरंभिले. काही वर्षांनी ब्रह्मदेव प्रसन्न होताच त्याने आपल्याला “काम वश होईल अश्या कोणत्याही व्यक्तीकडून  मरण येणार नाही” असा वर प्राप्त करून घेतला. या वराने उन्मत्त होऊन तो त्रैलोक्याला ग्रासू लागला. एकदा त्याने भगवान शंकरांची प्रिय नगरी काशी वर हल्ला केला व तेथील नगरजनांना  त्रास देणे सुरु केले. हे पाहताच त्यांनी भगवान शंकरांना साकडे घातले. आणि भगवान शंकर आपल्या भक्तांच्या हाकेला धावून आले. प्रत्यक्ष कामदेवावर विजय मिळविणाऱ्या शंकरानी गजासुराशी घनघोर युद्ध करीत आपल्या त्रिशुळाने गजासुराचा वध केला. मृत्यू समयी गजासुराने त्यांच्याकडे वरदान मागितले की शंकराने आपले चर्म धारण करावे. शंकरानी ही विनंती मान्य करीत गजासुराच्या पोटात प्रवेश केला व त्याचे चर्म (कातडं) विस्तारलं. यावरूनच भगवान शंकरांचे एक नाव “गजचर्मधारी” असे देखील पडले.

गजासुरवधाचे हे देखणे शिल्प आपल्याला बारकाव्यांसहित होयसळांच्या मंदिरांमध्ये पाहायला मिळते. यात गजासुराच्या मस्तकावर नृत्य करणारा शिवशंकर आपल्याला त्याच्या शरीराच्या आतमध्ये त्याच्या आयुधांसह व नंदी आदी गणांसह पहाता येतो. यात गजासुराचे मागील दोन पाय देखील आपल्याला या चर्माच्या कडेने वरच्या बाजूला पाहता येतात.

हळेबिडूच्या शिल्पात तर या गजचर्माचा मृदुपणाअधोरेखित करण्यासाठी या गजचर्मातून शंकराच्या डावीकडील डमरूवरच्या एका हाताचे नख बाहेर आल्याचे देखील पाहता येते. या शिल्पात त्या गजाची शेपूट देखील स्पष्टपणे कळते. शंकराचे रौद्र स्वरूप स्पष्ट करताना शिल्पकाराने त्याला सुळे देखील दाखविले आहेत.

Mahesh Naik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *