खजुराहोतील शिल्प आणि कामसूत्राचा तथाकथित नरेटिव्ह –
खजुराहो हे कामशास्त्र किंवा श्रृंगार श्रेणीतील मंदिरापेक्षा खूप अधिक आहे. हिंदू ग्रंथांप्रमाणे जीवनाचे चार स्तंभ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या तत्वज्ञानावर आधारित खजुराहोची शिल्परचना आहे. मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालताना मानवाला त्याच्या आयुष्यातील चार महत्वाच्या तत्वांची जाणीव ही शिल्प करुन देतात. बाळाला छातीशी कवटाळून प्रेमाच्या वर्षावातूनच मातृधर्माचं पालन करणारी आई, अर्थाचं प्रतीक असलेली लक्ष्मी, कामवासनेतून होणारे पुरुष आणि प्रकृती यांचे मिलन, मोक्षप्राप्तीसाठी शरीरयातना भोगून पुर्णत्वास मिळण्यासाठी प्रयत्नशील असलेला योगी यांची ही शिल्प आहेत.
इथल्या मंदीरांवर मध्ययुगीन भारतात मुघल आक्रमणांच्यावेळी झालेला वार आणि त्याच्या खुणा भयावह आहेत. १८५ मंदिरांपैकी आज फक्त २१ मंदीरं उरली आहेत. जवारी मंदिरातील शंकराच्या आणि जैन मंदिरातील आदिनाथांच्या मुर्तीचे शीराशिवाय उभे असलेले धड पाहताना प्रचंड यातना होतात. बाळाला प्रेमाने गोंजारणाऱ्या आईचं शिल्प आणि बाळाचं उडालेलं शीर पाहताना मन खिन्न होतं. गंगा यमुना नदीचे प्रतीक असलेल्या शिल्पांच्या स्तनांवर झालेले वार मानवाच्या निचतम वागणूकीचा पुरावा आहेत.
खजुराहोत काय “ती” शिल्प बघायला गेली होतीस का..? असा प्रश्न मला अनेकांनी विचारला तेव्हा मला वाटू लागले की, इतकी वर्ष खजुराहो म्हणजे फक्त कामसूत्र हे समीकरण मुद्दामच मांडलं नसेल ना..? कारण अजूनही आपला समाज कामक्रीडेच्या बाबतीत बूजराच आहे. त्यामुळे ‘इरॉटीक स्ट्रक्चर’ असा प्रपोगांडा पसरवल्यावर येथे कोण फिरकणार..? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, खजुराहो हे जगप्रसिद्ध स्थापत्यकलेच्या नमुन्यासोबतच धर्मावर आणि भारतीय संस्कृतीवर झालेल्या आघातांची स्मृती आहे.
खजुराहोच्या स्थापत्यकलेची व्याप्ती ही “त्या” शिल्पांपेक्षा बरीच मोठी आहे. मानवी मनाची खोली व्यक्त करणारी आहे. भक्ती मार्गात अथांग बुडालेल्या योगींपासून शिव पार्वतीच्या पवित्र प्रेमाची ग्वाही देणारी, विष्णूच वराहरुप जगाला दाखवणारी, ममत्वाचा, शृंगाराचा, स्त्री हक्कांचा, जीवनाचा मार्ग समजवून सांगणारी ही विलक्षण स्थळं आहेत. खजुराहोतील मंदीरं हा आपल्या समृद्ध प्राचीन समाजाचा पुरावा आहेत. अनेकदा नैसर्गिक आणि मानवी आक्रमणांना बळी पडून देखील अजूनही डौलाने उभी आहेत. आपणही काशी, अयोध्या, मथुरे इतक्याच तन्मयतेने या मंदीरांना भेट द्यायला हवी. खंडीत मूर्तींची पुनर्स्थापना व्हायला हवी आणि ही मंदीरं फक्त भारतातील प्रेक्षणीयस्थळे म्हणून नव्हेत तर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेली धार्मिकस्थळे म्हणून प्रसिद्ध व्हायला हवीत असं मनापासून वाटतंय. ते होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत समाज म्हणून श्रद्धेने आपण या मंदीरांकडे यायला हवे.
शांभवी थिटे