रांझेश्र्वर मंदिर, रांझे –

पुणे परिसरात आपल्याला गडकिल्ले,घाटवाटा, जुने ऐतिहासिक वाडे, बारव,लेणी व अनेक तीर्थक्षेत्रानी नटलेला हा संपूर्ण जिल्हा आहे. तसेच याच परिसरातील आज आपण ऐतिहासिक गावातील प्रसिद्ध मंदिर पाहणार आहोत,ते म्हणजे रांझे गावातील रांझेश्र्वर मंदिर.
रांझे गाव ऐकलं तर आपल्यासमोर इतिहासातील एक प्रसंग आठवतो तो म्हणजे स्वराज्य साकारताना शिवाजी महाराजांना बरेच रयतेच्या हितासाठी व गुन्हेगाराना जरब बसेल असे अनेक निर्णय घ्यावे लागले. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी आणि पीडितांना योग्य आणि लवकर न्याय मिळावा व रयतेत विश्वास निर्माण व्हावा असे कार्य राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. याचे ठळक उदाहरण म्हणजे स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर रांझे गावाच्या मोकादमास छत्रपतींनी दिलेली कठोर शिक्षा!महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेला हा ऐतिहासिक निवडा आज ३७२ वर्षानंतर ही एक आदर्श न्याय निवडा मानला जातो. हा निवडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे.

पुण्यापासून तीस किलोमीटर दूर सिंहगड किल्ल्याच्या परिसरात खेड – शिवापूर गावाजवळ असलेले रांझे गाव. निसर्गाच्या सान्निध्यात रांझेश्वर हे महादेवाचे सुंदर मंदिर आहे.शिवकालीन पूर्व १६व्या शतकातील मंदिर बांधले गेले असल्याचे दाखले आपल्याला पाहायला मिळतात. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आधी उजव्या बाजूला आपल्याला हनुमानाचे मंदिर पहायला मिळते.भगवान हनुमान दर्शन घेऊन आपण प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरत मंदिराच्या समोरील नंदी मंडपा जवळ जाऊन पोहचतो.ह्या नंदीमंडप मधे आपल्याला तीन नंदी पहायला मिळतात.त्याचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करतो.प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला देवकोष्टकात गणपतीची सुबक मूर्ती पहायला मिळते.मंदिराच्या सभामंडपात गेल्यावर आपल्याला पाहिले कासव आणि त्याच्या समोर महादेवाची पिंड पहायला मिळते.मंदिरामधील शिवलिंग पण बघून मन प्रसन्न होते. जमिनीमध्ये हे शिवलिंग असून लिंगभोवती संगमरवरी आकार देण्यात आला आहे.
मंदिरामध्ये अजूनहि बाकी देवतांच्या मूर्ती आहेत जसे कि गजानन, गरुड देवता.

मंदिरात बाहेर पाण्याचे तीन कुंड आहेत. पूर्वी या कुंडामधील पाणी वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरण्यात येत असे. त्यातील पहिल्या टाकीला देव टाके म्हणून संबोधले जाते.ह्या तीन पाण्याच्या टाक्या त्याची रचना व जलव्यवस्था अप्रतिम पद्धतीने बनवलेली दिसते.यातील पहिले टाके पूर्ण भरले की त्याचे पाणी पुढील टाकीत जाऊन पडते,ते टाके भरले की त्यातील पाणी त्याच्या पुढील टाकीत जाते.आणि सगळ्या टाकी भरले का ते पाणी एक माणूस जाईल येवढ्या भुयारातून मंदिराच्या मागच्या बाजूला काढून दिलेले दिसते. अशी सुरेख जलव्यवस्था आपल्याला पहायला मिळते.

मंदिराच्या मागच्या बाजूला काही राहण्याचे वास्तू त्याचे अवशेष पहायला मिळतात.तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला अजुन पुराणे महादेवाचे सुंदर मंदिर पहायला मिळते.ते मंदिर पाहून आपली मंदिराची फेरी पूर्ण होते.

मंदिराशेजारील वरच्या बाजूस रांझेकरांचा वाडा आहे. वाड्याची अवस्था फारच खराब आहे. वाड्यामध्ये मागील बाजूस अजून एक सुंदर असे लक्ष्मी-नारायण मंदिर आहे. आहिल्याबाई होळकर यांचा काळात त्यांच्याकडे रांझेकर सरदार म्हणून असताना हे मंदिर बांधण्यात आले, अशी माहिती बाबा रांझेकर यांनी दिली. त्यांच्या बरोबरच सगळा वाडा फिरवून बघितला,वाड्यामधील तुळशी वृंदावन आणि पाण्याची आड ( विहीर ) अजूनही बऱ्यापैकी स्थितीमध्ये आहे.सध्या वाड्यामध्ये एक वृद्धाश्रम आहे जिथे १०-१२ वृद्ध लोक राहतात.

गाव छोटेखानी असल्याने शांतता आढळून येते. पुण्यापासून हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात शांत आणि सुंदर निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर पहायला मिळते. आवर्जून बघण्यासारखे असल्याने ज्यांना इतिहासाची आवाड आहे त्यांनी नक्कीच भेट द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *