पट्टदकल येथील मंदिराच्या गर्भगृहात असलेली महिषासुर मर्दिनी –
कलेच्या क्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तीची निर्मिती कधी पासून प्रारंभ झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणतः शुंग कालपासून पाषाण निर्मित दुर्गा देवी पहावयास मिळते. असे काही अभ्यासक मानतात. कारण या पाषाण शिल्पात सिंह ही काही ठिकाणी कोरलेला आढळून आला आहे. गुप्त काळात दुर्गा देवीची अशी अनेक शिल्प आहेत. ज्या मध्ये स्कंद कार्तिकेय देवीच्या मांडीवर बसलेला कोरलेला आहे. गुप्त काळानंतर सिंह वहिनी दुर्गा प्रतिमा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या दिसतात. देवी महात्म्य, मत्स्यपुराण, रूपमंडन या ग्रंथात देवीस कात्यायनी म्हटलेले आहे.
निरनिराळी रूपें घेऊन आदिशक्तीने चण्ड, मुण्ड, शुंभ, निशुंभ, वगैरे राक्षसाचा संहार केला. त्यात महिषासुरांचा संहार करणारी जी देवी तिला दुर्गा असें म्हणतात. रंभ नावाच्या असुराला महिषीपासून अग्नीच्या प्रसादाने झालेला मुलगा महिषासुर याने ब्रह्मदेवाची आराधना केली. त्याच्या इच्छेप्रमाणें त्याला अमरत्व तर मिळाले नाही पण एवढी सूट मिळाली की, त्याचे मरण स्त्री शिवाय दुसऱ्याच्या हातून होणार नाही. स्त्री ही अबला असल्यामुळे आपणास कोणतीही भीती असणार नाही, असे समजून महिषाने पराक्रम गाजविण्यास सुरवात केली आणि देवांना सगळी- कडून हुसकवून लावले. इंद्र, अग्नी, वायू, चंद्रमा, यम, वरून इत्यादी देवतांचे अधिकार स्वतः उपभोगू लागला. स्वर्गावर नियंत्रण प्रस्थापित केले. ब्रम्हा, विष्णु व शंकराच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी आपापल्या सम्मिलित तेजाने एक स्त्री उत्पन्न केली. (शिव तेजाने देवीचे मुख, यमाच्या तेजाने केश, विष्णूच्या तेजाने भुजा, चंद्रमाच्या तेजाने वक्ष:स्थल, इंद्राच्या तेजाने कटीप्रदेश, वरूनाच्या तेजाने जंघा आणि मांड्या, पृथ्वीच्या तेजाने नितंब निर्माण झाले. अशाच प्रकारे ब्रम्हाच्या तेजाने चरण तथा सूर्याच्या तेजाने पायाची बोटे, कुबेराच्या तेजाने नासिका, प्रजापतीच्या तेजाने दात, अग्नीच्या तेजाने तीन नेत्र, संध्याच्या तेजाने बाहू तथा वायूच्या तेजाने कान निर्माण झाले. अशा प्रकारे प्रसन्न देवतांनी आपले आयुधे देवीस दिले.) हीच महाशक्ति होय. हिचेच निरनिराळ्या रूपाने वर्णन मिळते. याच देवीने पुढे महिषासुराचा वध केला व पुनश्च दैवी संपत्ति आणि समृद्धीची स्थापना केली. तिचे वाहन अर्थात् सिंह हा तिला हिमालयाकडून मिळाला होता. त्याचप्रमाणें निरनिराळी आयुधें ही वेगवेगळ्या देवांकडून मिळाली. आज देशांत साधारणपणे ज्या दुर्गेची आराधना चालू आहे ती महिषासुरमर्दिनी दुर्गा होय. तिचे बाहू, आयुधे, रूप वगैरेचा विस्तार फार मोठा आहे. पण ढोबळमानाने नवदुर्गा म्हणून हिची नऊ रूपें – शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चित्रघंटा, कूष्माण्डा, स्कन्दमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदा प्रसिद्ध आहेत. ही नांवे काशीकडे आहेत. इतरत्र नावात भिन्नता आहे. देवीच्या या रुपास विशेष रूप किंवा विशेष अवतार असे म्हणता येईल. देवीचे रूप हे शक्ती समुच्चयाचे प्रतीक असल्याने कदाचित याच मुळे सर्वाधिक दुर्गा देवीच्या मूर्ती निर्माण केल्या असाव्यात.
शिव-शक्ती दुर्गा (दुर्गा-वैरोचनी) चा सर्वात प्राचीन संदर्भ तैत्तिरीय अरण्यकमध्ये उपलब्ध आहे. येथे रुद्राचे वर्णन दुर्गा वैरोचनी असे केले आहे, जे त्याच्या पत्नी अंबिकेच्या अनेक नावांपैकी एक आहे. बौधायन गृह्य सूत्रात दुर्गेच्या उपासनेच्या पद्धतीचे वर्णन केले आहे, परंतु पौराणिक कालखंडात आढळणारे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आजपर्यंत समोर आले नव्हते. उदाहरणार्थ, या काळात दुर्गेशी संबंधित सिंहाची कल्पना अजून आली नव्हती. गृह्यसूत्रांच्या काळापर्यंत सिंहाच्या उग्र आणि सौम्य स्वरूपाची कल्पना जन्माला आली होती. महाभारतातील दुर्गास्तोत्रानेही याची पुष्टी केली आहे.
पौराणिक कालखंडात दुर्गेच्या अनेक पैलूंची तपशीलवार कल्पना केलेली दिसते. मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्यामध्ये संध्या, सरस्वती, चंडिका, गौरी, महालक्ष्मी, ललिता इत्यादी दुर्गेची अनेक नावे काल्पनिक वयाच्या आधारे देण्यात आली आहेत. एक वर्षाची मुलगी संध्या, दोन वर्षांची सरस्वती, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊवर्षाची दुर्गा, दहा वर्षांची गौरी, तेरा वर्षांची महालक्ष्मी आणि सोळा वर्षांची ललिता अशी त्यांची नावे आहेत.
दुर्गेस गृह्यसूत्रांमध्ये एक महत्त्वाची देवी म्हणून वर्णन केले आहे आणि महाभारतातील सर्वोच्च अस्तित्व म्हणून स्वीकारले गेले आहे. पुराण आणि आगम साहित्यात नऊ प्रकारच्या दुर्गा (नवदुर्गा) सांगितल्या आहेत. या नवदुर्गा मूर्तींची नावे मार्कंडेयपुराण, अग्निपुराण, गरुडपुराण आणि आगमामध्येही उपलब्ध आहेत. पुराण आणि आगमाच्या वरील वर्णनांप्रमाणेच, इतर वास्तुशास्त्रातही दुर्गा (नवदुर्गा) च्या नऊ मूर्तींचे वर्णन केले आहे, परंतु वरील शास्त्रांच्या नवदुर्गा-सूचीचे कोणत्याही सूचीशी पूर्ण साम्य नाही, फक्त क्षेमंकरी आणि हरसिद्धी हे दोन नाव आगमाच्या यादीतून घेतलेले दिसतात. अपराजितपृच्छ आणि देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सर्व नऊ मूर्तींचे वर्णन आहे आणि रूपमंडनमध्ये फक्त तीन मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छात नमूद केलेल्या नव दुर्गा मूर्ती म्हणजे महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी. देवमूर्तीप्रकरणातही याच दुर्गेच्या मूर्तींचे वर्णन आहे, फक्त दोन नावांमध्ये काही बदल झाले आहेत. येथे शिवदूतीला सर्वती आणि भ्रमरीला भ्रमणी असे म्हणतात. रूपमंडनमध्ये महालक्ष्मी, क्षेमांकरी आणि हरसिद्धी या तीन दुर्गा मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छ आणि रूपमंडनमध्ये या दुर्गा मूर्तींचे वाहन सिंह असे वर्णन केले आहे. इतर प्राचीन धर्मग्रंथांपैकी अग्निपुराण आणि गरुडपुराणातही दुर्गेच्या सिंह वाहनाचे वर्णन आढळते. उल्लेख केलेल्या सर्व दुर्गा मूर्ती चतुर्भुज आहेत. त्यांचे वेगवेगळे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
मार्कंडेयपुराणामध्ये वर्णन केलेल्या नवदुर्गा मूर्ती शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता कात्यायनी, कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशा सांगितल्या आहेत. तर अग्निपुराण नुसार रूद्रचंडा, प्रचंडा, चंडोग्रा, चंडनायिका, चंडा, चंडवती, चंडरुपा, अतीचंडा आणि उग्रचंडा ही नावे येतात तर आगम ग्रंथानुसार नीलकंठी, क्षेमंकरी, हरसिद्धी, रुद्राक्षदुर्गा, वनदुर्गा, अग्निदुर्गा, जयदुर्गा, विद्यावासिनी आणि रिपुमर्दिनीदुर्गा सांगितले आहे. तसेच अपराजितपृच्छा नुसार महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी असे वर्णन उपलब्ध होते. दुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मंडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नवदुर्गांचा उल्लेख आहे.
प्रतिमा शास्त्रानुसार देवीच्या हातांच्या संख्येचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे.
महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महाचंडा, भ्रमरी सर्वमंगला, रेवती, हरसिद्धी या चतुर्भुज तर कात्यायनी दशभुजा, भद्रकाली अष्टादशभुजा (१८), दुर्गा षोडशभुजा किंवा अष्टादशभुजा (१६/१८), चामुंडा चतुर्भुज किंवा अष्टभुजा (४/८) असाव्यात.
देवी शिल्पात विविध भुजाधारिनी कोरलेली पहावयास मिळते. देवीच्या मूर्तीतील वरील हातात कधी कधी एखादी दोर किंवा साप सदृश्य वस्तू दाखविण्यात येते. त्यास काही अभ्यासक केसांच्या जटा किंवा केसात माळण्यासाठी असलेली माला संबोधतात. परंतु वामन पुराणानुसार, ‘रुरू नावांच्या असुराने कालीवर आक्रमण केले. तिने आपल्या खट्वांगाने त्याला मारले व असुराचे कानापासून पायापर्यंतचे कातडे काढून त्याने आपल्या जटा बांधल्या. एक अवखळ जटा बांधली जात नाही असे पाहून तिने तिला उपटून जमिनीवर रागाने आपटले. भूमिवर पडलेल्या त्या जटेपासून चण्डमारीची उत्पत्ति झाली.’ अशी कथा येते. याच कथेवर आधारित एक मूर्ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिरावरील बाह्यांगवर पहायला मिळते. (प्रस्तुत मूर्ती आमच्या मूर्ती शास्त्र अभ्यास सहलीत अनेक चर्चेअंती काली असल्याचे शिक्का मोर्तब झाले. परंतु दैत्य कोण हे लक्षात येत नव्हते. बऱ्याच ग्रंथात धुंडोळा घेतल्या नंतर मी आणि श्री लक्ष्मीकांत सोनवटकरांनी ही रुरू या दैत्याला मारणारी वामन पुराणातील काली असल्याचे मराठवाडा इतिहास परिषदेत सिध्द केले.)
नवदुर्गा हिचे मूर्ती शास्त्रीय लांच्छने या अनुषंगाने आपण देविरुप पुढील प्रमाणे पहाणार आहोत.
धार्मिक ग्रंथानुसार आजचे रुप क्षेमंकरी असले तरी प्रतिमा लक्षणानुसार पहिले रूप हे महालक्ष्मी आहे. (अपराजितपृच्छ, रूपमंडन, देवतामूर्तीप्रकरण)
महालक्ष्मी –
या दुर्गेच्या मूर्तीचे वर्णन तिन्ही शास्त्रांमध्ये आहे. या शास्त्रानुसार महालक्ष्मीच्या निळ्या गळ्यात नाग धारण केलेला असावा आणि तिचा एक हात वरद मुद्रेमध्ये आणि उरलेले तीन हात त्रिशूल, खेटक आणि पानपात्र सोबत असावेत. शिल्पकलेतील दुर्गेच्या महालक्ष्मी-स्वरूपाचे चित्रण दुर्मिळ आहे. वर सांगितलेली शास्त्रवर्णनाशी तंतोतंत जुळणारे महालक्ष्मीचे एकमेव शिल्प चित्तौडगड-विजय स्तंभवरील ‘नवदुर्गा समूहा’मध्ये आढळते.
नंदा:
या मूर्तीचे वर्णन केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात केले आहे, रूपमंडन मध्ये उपलब्ध नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणावरून असे ज्ञात होते की, देवी नंदाच्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, खड्ग, खेटक आणि पानपात्र असावे.
क्षेमंकरी-
क्षेमंकरीची प्रतिमा-लक्षणे तिन्ही शास्त्रांमध्ये आहेत, परंतु यातील रूपमंडनाचे वर्णन इतर दोन ग्रंथांतील वर्णनांपेक्षा काहीसे वेगळे आहे. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणानुसार क्षेमंकरीचा एक हात वरद मुद्रेमध्ये असावा आणि उरलेल्या तीन हातात अनुक्रमे त्रिशूळ, कमळ आणि पानपात्र असावे. रूपमंडनमध्ये क्षेमंकरीच्या हातात अनुक्रमे वरद मुद्रा, त्रिशूल, खेटक आणि पानपात्र असे वर्णन केले आहे. त्यामुळे देवीच्या तिसर्या हातातील कमळाऐवजी खेटकाचा उल्लेख बदलून महालक्ष्मी व क्षेमंकरी यांच्या हातातील शस्त्रे एकच असल्याचे सांगितले जाते.
शिवदूती किंवा सर्वती-
दुर्गेच्या चौथ्या मूर्तीला अपराजितपृच्छा मध्ये शिवदूती आणि देवतामूर्तीप्रकरणात सर्वती असे म्हटले जाते, परंतु दोन्ही शास्त्रात उपलब्ध या मूर्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहेत. रूपमंडन मध्ये या मूर्तीचा उल्लेख नाही. इतर दोन शास्त्रांनुसार, दुर्गेची ही मूर्ती कमंडलू, चक्र, खेटक आणि पानपात्राने सुसज्ज असावी. शिल्पकलेमध्ये महालक्ष्मी आणि नंदाप्रमाणे दुर्गेच्या शिवदुती किंवा सर्वती स्वरूपाचे दुर्मिळ चित्रण आढळते.
महारंडा –
महारंडाचा उल्लेख रूपमंडनमध्ये नाही आणि या मूर्तीची वैशिष्ट्ये इतर दोन शास्त्रांमध्ये काही वेगळ्या प्रकारे दिली आहेत. अपराजितपृच्छा नुसार महारंडाची मूर्ती खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि खेटक यांनी सज्ज असावी, तर देवतामूर्तीप्रकरणात महारंडा अनुक्रमे खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि पानपात्र या लांच्छणाने सुसज्ज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देवतामूर्तीप्रकरणात देवीच्या शेवटच्या हातातील पात्राचा उल्लेख खेटकाऐवजी बदलला आहे. शिल्पकलेमध्ये क्षेमंकारीप्रमाणेच महारंडाचे सामूहिक आणि स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात चित्रण करण्यात आले होते.
भ्रमरी किंवा भ्रमणी- महारांडाप्रमाणेच या दुर्गेच्या मूर्तीचा उल्लेखही रूपमंडनमध्ये नाही आणि इतर दोन ग्रंथांमध्येही देवीचे नाव आणि तिच्या शेवटच्या हातातील शस्त्र बदलले आहे. अपराजितपृच्छात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीला भ्रमरी असे म्हणतात आणि तिच्या हातात अनुक्रमे खड्ग, डमरू, खेटक आणि पानपात्र असल्याचे वर्णन केले आहे, तर देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीचे नाव भ्रमणी आणि शेवटच्या हातात पानपात्र ऐवजी पाश असल्याचा उल्लेख आहे आणि इतर तीन हातांची शस्त्रे निश्चितपणे खड्ग, डमरू आणि खेटक आहेत. शिल्पकले मध्ये भ्रमरी किंवा भ्रमणी यांच्या वरील वर्णनांशी साधर्म्य असलेली मूर्ती दुर्मिळ आहेत.
सर्वमंगला-
सर्वमंगलाचा उल्लेख केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात आहे, रूपमंडनमध्ये नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरण नुसार, सर्वमंगला आपल्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, वज्र, घंटा आणि पात्र धारण करते.
रेवती-
सर्वमंगलाप्रमाणे रेवतीचा उल्लेख रूपमंडन मध्ये नाही आणि इतर दोन शास्त्रांमध्ये वर्णन केलेली या देवीची हातातील शस्त्रे सारखीच आहेत. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरण या दोन शास्त्रांनुसार, रेवतीच्या हातात अनुक्रमे दंड, त्रिशूळ, खटवांग आणि पानपात्र असले पाहिजेत.
हरसिद्धी-
हरसिद्धीचे मूर्ती लक्षण तीनही शास्त्रांमध्ये आढळते. या शास्त्रानुसार हरसिद्धीने आपल्या हातात अनुक्रमे कमंडलू, खड्ग, डमरू आणि पानपात्र धारण केले पाहिजे.
सामुहिक चित्रणांमध्ये वरील प्रमाणे उल्लेखित मूर्ती या केवळ चित्तोडगड-विजय स्तंभाच्या नवदुर्गा-समूहात कोरलेल्या आढळून येतात.
संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार
ओळख मूर्तीशास्त्राची – डॉ अरविंद सोनटक्के