नागार्जुन हा भारतीय रसायनशास्त्रांतील एक मोठा शोधक होऊन गेला. मंत्र-तंत्र-रसविद्या व ‘पादुकासाधन’ यांत तो प्रवीण होता अशी दंतकथा आहे. या रसविद्येसाठींच तो सनातनधर्म सोडून जैन झाला असें म्हणतात. गदग गांवाजवळील एक पर्वत त्यानें सोन्याचा केल्यामुळें व ही किमया तो सर्वांनां सांगूं लागल्यामुळें देवांनीं त्यास ठार केलें अशी कथा आहे. तो म्हणे “भृंग बेंयिलिल्ल। वंग खलियल्लि । रस निल्ललिल्ल। सुट्टू कंगेट्टु हाळनादे भिक्षांदेहि” (म्हणजे, अभ्रक शिजला नाहीं, बंगाचा स्तंभ झाला नाहीं व रस अग्नींत टिकला नाहीं, म्हणून मी भीक मागत आहे, भिक्षा घाला) यानें कानडींत व संस्कृतांत रसविद्येवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत म्हणतात. हाच नागार्जुन पुढें जैन धर्म सोडून बौद्ध बनला असावा. नंदिसूत्रें व आवश्यकसूत्रें यांत याचा उल्लेख आहे. तसेंच ह्युएनत्संगहि याचें नांव घेतो. यानें न्याय, तर्क, वैद्यक वगैरे अनेक शास्त्रावर ग्रंथ केले. सतीशचंद्र विद्याभूषण हे याला हिंदुस्थानचा अरिस्टॉटल म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *