धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावरील मोहिनी की काली : एक शोध –
भारतीय मूर्ती कलेचा इतिहास समजून घेण्यासाठी पुराणाचा अभ्यास असणे अनिवार्य आहे. कारण देवी-देवतांच्या नाना विधिरूपे पुराणानीच बहाल केलेली आहेत. त्यातीलच काही रुपे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावर पाहावयास मिळतात. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरीच्या मंदिरावर असलेल्या एका देवी शिल्पास मोहिनीचे शिल्प असे अभ्यासकांचे म्हणणे असून हे मोहिनीचे शिल्प नसून कालीचे शिल्प आहे.
गावाजवळच एका खडकाळ शेतात चालुक्यकालीन कलेचा अप्रतिम अविष्कार असलेले केदारेश्वर मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे धर्मापुरीतील जतन केलेले असे एकमेव मंदिर होय. नुकतेच या मंदिराचा पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धार करण्यात आला. अर्ध मंडप, मंडप, अंतराळ, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे केदारेश्वर मंदिर चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने बांधल्याची नोंद आढळून येते. मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या जंघा भागावर आकाराने पुष्ट असलेल्या शैव-वैष्णव तसेच शक्तांची मिळून एकूण 68 मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यातील मंदिराच्या पश्चिम पूर्व कोपऱ्यात अर्थात अग्नेय दिशेला पूर्वेकडे तोंड करून दक्षिण दिशेकडून अनुक्रमे आठव्या क्रमांकाची सुमारे 102 सेंटिमीटर उंच आणि 46 सेंटिमीटर रुंद अशी कालीची संहार मूर्ती आहे. या मूर्तीस अभ्यासकांनी भस्मासुराला मारणारी मोहिनी आहे असे म्हटले असले तरी, मूळच्या मोहिनी आणि भस्मासुराच्या कथेशी ही कथा जुळत नाही.
मूळच्या मोहिनी रूपातील विष्णूची कथा अशी आहे की, भस्मासुराला मारण्यासाठी विष्णूने अतिशय आकर्षक असे स्त्री रूप घेतले होते. भस्मासुरास शिवाने दिलेले वरदान असे होते की, ” तो ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो भस्म होऊन जाईल.” मिळालेल्या वरदानाच्या प्रचीती साठी भस्मासूर शिवाच्याच मस्तकावर हात ठेवण्यासाठी मागे लागला. तेव्हा शिवाचे रक्षण करण्यासाठी विष्णूने मोहिनी रूप घेऊन भस्मासुरा समोर आली असता; तिच्या अप्रतिम सौंदर्यावर भाळून भस्मासुराने मोहिनी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्या वेळी “मी एक नर्तकी असून मला नृत्यात प्रवीण असलेल्या व्यक्ती सोबतच लग्न करावयाचे आहे.” असे मोहिनीने म्हटल्यामुळे भस्मासुराने मोहिनीस नृत्य शिकवावे अशी विनंती केली. त्याच्या विनंतीस होकार देत मोहिनी भस्मासुरास नृत्य शिकवू लागली. अशा पद्धतीने मोहिनी रूपातील श्रीविष्णूने भस्मासुरास नृत्यास भाग पाडले. नृत्याच्या विविध मुद्रेत मोहिनीने (विष्णूने) स्वतःच्या मस्तकावर अचानक हात ठेवला व मिळालेल्या वरदानास विसरून तसेच कृत्य भस्मासुरा कडून झाले आणि स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवताच भस्मासुर जागीच भस्म झाला. हे विश्लेषण पाहता प्रस्तुत मूर्ती मोहिनीची असावी अशी यत्किंचित ही शक्यता नाही. केदारेश्वर मंदिरावरील सदरील मूर्तीचे अवलोकन केले असता. श्यामा रहस्य या ग्रंथातील कालिच्या वर्णनाप्रमाणे चतुर्भुज, मुंड माला विभूषित, घोर दंतावली, पुष्ट आणि उन्नत स्तना असलेली, असे वर्णन सांगितलेले आहे.
प्रस्तुत शिल्पात स्त्रीरूपी देवता राक्षसाच्या मुखवरील त्वचा सोलून काढीत असल्याने ती मोहिनी रूप होऊ शकत नाही. तर या शिल्पातील स्त्री देवता अलिढासनातील स्थानक मूर्तीत चतुर्भुज असून प्रदक्षणा क्रमाने उजवा हात चेहऱ्यावरील कातडी सोलून काढीत आहे. तर उजव्या वरच्या हातात त्रिशूल किंवा खट्वांग प्रमाणे तुटलेले शस्त्र दिसते आहे. डाव्या वरच्या हाताने राक्षसाने मारलेल्या खडगास वरच्यावर रोखून धरलेला असून खालच्या डाव्या हाताने राक्षसाचे केस गच्च धरलेले आहेत. देवीची शरीररचना प्रमाणबद्ध सुंदर असली तरी, बाहेर आलेले सुळे दात, त्रिशूल किंवा खट्वांग, शरीरावर रेंगाळणारी मुंड माला या लक्षणांवरून ती काली असून मोहिनी ठरत नाही. वामन पुराणात रूरू नावाच्या असुराने काली वर आक्रमण केले असता तिने आपल्या खट्वांगाने त्याला मारले व त्या असुराचे कानापासून पायापर्यंतचे कातडे सोलून काढून त्या कातड्याच्या वादी बनविल्या आणि त्याने आपल्या जटा बांधल्या. असा उल्लेख आलेला आहे. या कथानकावरून ही मूर्ती कालीची आहे, हे स्पष्ट होते. वामन पुराणातील या कथानकाप्रमाणे मूर्तीतील देवीने डाव्या हाताने राक्षसाचे किंवा दैत्याचे केस धरून उजव्या हाताने त्याच्या चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे सोलून काढलेली आहे. त्यामुळे राक्षसाची कवटी दिसत असून डोळे कवटीच्या खोबणीतून बाहेर आलेली आहेत. तसेच नाकाचे हाड ही स्पष्ट दिसते आहे. ओढून काढलेली त्वचा गळ्याजवळ एकत्र जमलेली असून त्वचेचा नाकावरील भाग, डोळ्यांची बुबुळे असलेली पोकळ जागा तसेच ओठ ही कोरलेले दिसतात.
शिल्पकलेच्या दृष्टीने प्रस्तुत शिल्प निर्माण करणे ही कलाकाराच्या कलेची कसोटी होती असे म्हणावे लागेल. कारण या शिल्पात चेहऱ्यावरून सोलून काढली त्वचा दाखविण्याचे कसब सामान्य शिल्पीचे नक्कीच नाही. धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरास भेट दिल्यास नक्कीच हे शिल्प आपले लक्ष वेधून घेणारे असणार आहे हे निश्चित. नेहमी देवतेच्या रूपा वरून राक्षस शोधत असतो पण इथे राक्षसा वरून देवतेची ओळख पटली हे विशेष आहे. रुरू सिद्ध झाल्या वरच काली पूर्ण झाली असे म्हणावे लागेल.
टीप :- या शिल्पा संबंधी मराठवाडा इतिहास परिषदेच्या 40 व्या अंकात शोधनिबंध सादर करण्यात आला आहे. अभ्यासूंनी मूळ शोधनिबंध पहावा.
संदर्भ ग्रंथ कर्त्यांचे आभार.
डॉ. अरविंद सोनटक्के,
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर. जि. नांदेड