प्रत्येक मंदिर एक प्रसंग समोर आणतं.कोण्या उत्सवकाळात इथे जमलेली भाविकांची मांदियाळी.यज्ञवेदितून उठलेली धुम्रवलयांकित आवर्तनं.या मल्लिकार्जुनाच्या शेजारी असलेल्या पुष्करणीच्या काठावर रंगलेल्या गप्पा.इथल्या देवकोष्टकांमध्ये कोण्या शुभरात्री सजलेले दिवे.भक्तीभावाची गोपुरे अभिमानाने मिरविणारा हजार एक वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेला सभामंडप.यादव सम्राटाची दर्शनासाठी येणारी राजस्वारी. इथल्या मैथुनशिल्पांकडे पाहून कदाचित अलगदपणे लाजलेली मंडळी आणि त्याच शिल्पांच्या शिल्पकारांची न दमता स्तुती करणारे कलाकार.वराहमंडपात आश्रयास असलेले आणि पहिल्या प्रहरी अर्पण केल्या जाणाऱ्या पूजेसाठी लगबग करणारे वाटसरू.या सगळ्याकडे अतिशय प्रसन्नवदनाने तितक्याच दिमाखाने पाहणारा,अंगावर देवदेवतांची शिल्पं मिरवणारा यज्ञवराह.इतकं सगळं पाहिलं असेल या मंदिराने.आज इतिहास नावाचा एक साक्षीदार अबोल वाणीने तिथे जाणवतो.त्याच्याशी बोलत बोलत ‘ ये हृदयीचे ते हृदयी ‘ न्यायाने सगळं हृदयात साठवून ठेवायचं..