खेड शिवापूर आणि परिसर –

खेडेबारे मावळ पुण्याच्या दक्षिणेस कात्रजची डोंगररांग च्या पलीकडे येणारी गाव किंवा भाग. १६३६ – ३७ च्या सुमारास येथे कसबे पेठ शिवापूर वसवले गेले. आता ते खेड शिवापूर म्हणून ओळखले जाते.याच परिसराची आज आपण सफर करणार आहोत.

शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वाडा/बापुजी मुद्गल देशपांडेचा वाडा –

आऊसाहेब आणि शिवाजीराजे बेंगलोरहुन पुण्यात आपल्या जहागिरी वर आल्यावर त्यांना पुण्यात वास्तव्यास घर नव्हते. आदिलशाही सरदार मुरार जगदेव ने पुणे जाळुन गाढवाचा नांगर फिरवून पुणे पार उध्वस्त केले होते. आऊसाहेबांनी पुण्यात कसबा गणपतीची स्थापना करुन लालमहालाचे बांधकाम सुरू केले. पण बांधकाम होईपर्यंत राहायचे कुठे हा प्रश्न होता. तेव्हा बापुजी मुद्गल देशपांडे यांनी त्यांच्या खेडबारे ( आजचे खेड शिवापूर ) येथील वाड्यात राहण्याची विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन आऊसाहेब व शिवबा राजे खेड बारे येथे राहावयास गेले व तेथुनच आऊसाहेब व शिवाजी राजांनी स्वराज्याचा श्रीगणेशा केला. एवढी मोठी ऐतिहासिक वास्तू पण आज दुर्लक्षित आहे.

नागेश्वर मंदिर –

खेड शिवापूर म्हणलं की आपल्याला आठवत ते शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वाडा. या वाड्या व्यतिरिक्त खूप सारी ऐतिहासिक पार्श्वभूमी येथे आहे. त्यातीलच एक म्हणजे शिवापूर जवळील मौजे श्रीरामपूर(बांडेवाडी) येथील ऐतिहासिक नागेश्वर मंदिर. या मंदिरात जाण्यासाठी पुणे – सातारा हायवे वरून कोंढणपूर फाटा येथून उजवीकडे कोंढणपूर – शिवापूर रोड ला जावे. पुढे श्रीरामनगर या गावी बस स्टॉप च्या समोरूनच या मंदिराजवळ जाता येते.

मंदिराच्या बाहेर स्थानिक गावकऱ्यांनी एक छान पैकी कमान बांधली आहे आणि त्यावरच मंदिराचं नाव आहे. चार पायऱ्या उतरून घेल्यावर लगेचच आपल्याला दोन विरगळी पाहायला मिळतात. विरगळी पाहताना लक्षात येत की या चार कप्प्यात आहेत. त्यातील एक वीरगळ ही खूप रेखीव बनवली आहे, यात सर्वात खालच्या कप्प्यात वीर मृत्यु झालेला दिसत आहे, त्याच्या वरच्या कप्प्यात तो लढताना दिसत आहे, त्याच्या वरच्या कप्प्यात तीन अप्सरा या त्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आल्या आहेत. बऱ्याच विरगळी मध्ये आपल्याला दोन अप्सरा दिसतात तर दोन पेक्षा जास्त अप्सरा असलेला वीर हा तेवढा मोठ्या पदावरचा असतो अस समजलं जातं. त्याच्या वरच्या कप्प्यात तो शिवपिंडीची पूजा करताना दिसत आहे म्हणजेच त्याला शिवा ची पूजा करण्याचा मान मिळालेला आहे. वीर हा नमस्कार मुद्रेत बसलेला आहे, पिंडीच्या खाली नंदी आहे, पुजारी एका हाताने घंटा वाजवत आहे, दुसऱ्या हातात बेलपत्र असावं. त्याच्यावर स्वर्गमंचकारोहन कलश आहे म्हणजेच तो वीर स्वर्गात पोचला अस आहे. अशा एकूण चार विरगळी या मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतात.

मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश करण्याअगोदर बाहेर एक खूप छान असा नंदी आहे. महाद्वाराच्या उजव्या बाजूला दोन दगडावर सुमारे चौदा ओळींचा शिलालेख लिहिलेला आहे. हा शिलालेख खूप महत्वपूर्ण असून मंदिराच्या जीर्णोद्धाराची माहिती यात दिलेली आहे. फोटोंमध्ये शिलालेखाचे फोटो आणि शिलालेखवरील माहिती ओळींसाहित दिली आहे. शालिवाहन शकाच्या (१६१८) साल इ स वी सन १६९६ धातानाम संवत्सरातील  कार्तिक शुद्ध पंचमीसह षष्ठीस. शिवराम गोपाळ (अत्रे) देशकुलकर्णी परगण्यातील सासवड, ऋग्वेदी याने देवालय, सुंदर वृक्ष आणि फुलांची बाग निर्माण केली. असा याचा थोडक्यात अर्थ होतो. म्हणजे हे मंदिर छ. राजाराम महाराजांच्या काळात बांधलेलं असावं असा अंदाज लावता येतो. काही चुकलं असेल तर जाणकारांनी माहिती द्यावी.

मंदिराच्या बाजूचा परिसर हा अतिशय शांत आणि झाडाझुडपांनी वेढलेला आहे. मंदिराच्या समोरूनच एक पाण्याचा ओढा गेलेला आहे त्यात अजूनही पाणी वाहत.

खुलेश्वर मंदिर –

शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खेड शिवापूरच्या मातीतील दुर्लक्षित शिवमंदिर. अत्यंत सुंदर व अजूनही सुस्थितीत असलेलं अस हे शिवमंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. मंदिर थोडसं गावाबाहेर आहे. मंदिरासमोर वीट बांधकामातील साधारण तीन मजली मनोरा आत जावून बघता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *