माणकेश्वर मंदिरावरील कर्पूरमंजिरी –

कल नुमाइश में फिर गीत मेरे बिके
और मैं क़ीमतें ले के घर आ गया,
कल सलीबों पे फिर प्रीत मेरी चढ़ी
मेरी आँखों पे स्वर्णिम धुआँ छा गया।

नुकतीच ही गजल वाचण्यात आली. कोण्या अनामिकाने हे लिहलेले वाचून मन खिन्न झाले. नुकतेच माणकेश्वर (तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद) येथील माणकेश्वर मंदिरास भेट दिली. मंदिर आणि गावाचे नाव एकच असल्याने शोधणे अवघड नाही. (गुगल बाबा आहेतच) अतिशय भव्य असे त्रिदल मंदिर, सुंदर रेखीव काम केलेल्या द्वारशाखा, बाह्यांगावर भग्न सुरसुंदरी यांची रेलचेल, रिकामी देवकोष्ट सारे काही मन उदास करणारे असले तरी, जे शिल्लक आहे; ते नसे तोकडे असे म्हणून गोड करून घ्यायचे ठरविले आणि निघालो एक एक शिल्प पाहत. त्यातील प्रत्येक शिल्पाचे वेगळेपण हळूहळू जाणवायला लागले. केश रचना, अलंकार, मेखला, वस्त्रालंकार, उभे राहण्याची ढब. त्यातील दर्पणा, शुकसारिका, विन्यासा, केतकीभरणा, चामरा, पद्मगंधा, तोरणा, मुग्धा, अलसा असे एक एक शिल्प न्याहाळताना अचानक एके ठिकाणी थबकलो. असे शिल्प पहिले नव्हते, असे नाही. पण यातील सौंदर्य काही वेगळेच भासत होते. ही आहे ‘कर्पुरमंजिरी’ म्हणजे जी, ‘न्हाऊन झाल्यावर केसातून पाणी पिळून काढत असलेली’  शिल्पांकित केली जाते. स्नान केल्या नंतर स्त्री अधिक प्रसन्न, उल्हासित आणि कामुक भासते.

क्षिरार्णव या ग्रंथात ‘नग्नभावे कृतस्नाना नम्ना कर्पुरमंजिरी’ असे वर्णन येते. चितोड येथील कीर्ती स्तंभावर हिच्या शिल्पासह कर्पूरमंजिरी असे नाव कोरलेले आढळते. तिच्या मऊ मुलायम केसातून निथळणारे थेंब हंस किंवा चातक आसुसले पणाने पित असताना दाखविले जाते. बहुतांश ठिकाणी केवळ कल्पना करावी लागते. कारण चातक किंवा हंस यांची उपस्थित नसते. प्रस्तुत शिल्पात त्रिभंग अवस्थेत ही ‘ ललना ‘ उभी असून अंगप्रत्यांगाने ती नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली नवयौवना आहे अशी भासते. गळ्यामध्ये ग्रैवैयक, स्तनहार, बाजूबंद, कंकण, मेखला, तोडे, पदजालक हे तिच्या कमनीय देहावर शोभून दिसतील असे मोजकेच अलंकार तिने परिधान केलेले आहेत. कदाचित तिरप्या चेहऱ्यावर सुंदर असे शिरोभूषण असावे. तसेच धनुष्याकृती भुवया, धारदार नासिका, पातळ नाजूक ओठ, आंब्याच्या कोई सारखी हनुवटी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालीत असावेत. आज आपण केवळ कल्पना मात्र करू शकतो.

बांधेसूद शरीर, हाताच्या पंजाने मोजता येईल अशी नाजूक कटी, डाव्या पायावर सर्व शरीराचा भार असल्याने अगदी गोलाईयुक्त नाजूक डावा कमरेचा भाग, देहूडा पाऊली उभी असलेली ही सूरसुंदरी तिच्या कमनीय देहाचा प्रत्येक अवयव तारुण्याची उधाण ल्यालेला दाखवण्यात कलाकाराला विलक्षण यश लाभलेले आहे. तिचे गोलाकार स्तन मंडळे दाखविण्यात कलाकाराचे कसब पणाला लागलेले आहे. अत्यंत रेखीव अवयवाची ही सूरसुंदरी आपल्या उजव्या हाताने केस सांभार सांभाळत; असलेले घनदाट केस हळुवार पिळत असताना तिच्या केसातून ठिबकणारे थेंब जणू काही मोती आहेत. असे समजून हंस पक्षी ते मोती टिपण्याच्या तयारीत आहे. सदरील शिल्पात कोरलेला हंस आपली चोंच उघडून प्रत्येक थेंब अधाशासारखा पिण्यास व्याकुळ झालेला आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रस्तुत शिल्प केवळ एक बाय तीन फूट एवढ्या जागेत कोरलेले आहे.

( हंस हा तसा शाकाहारी प्राणी असून क्वचित प्रसंगी पाण्यातील किडे खातो. त्याचे पाणी आणि दलदलीच्या ठिकाणी वास्तव्य असते. हंस मोती खातो अशी धारणा प्राचीन काळापासून साहित्यात दिसून येते. परंतु यात कवी कल्पनेच्या पलीकडे वास्तवाशी संबंध नाही. )

संदर्भ ग्रंथ कर्त्याचे आभार.

ओळख मूर्तीशास्त्राची – डॉ अरविंद सोनटक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *