हंपी ट्रिप !
हंपी एक छोटंसं गाव काहीही म्हणा! विविध वास्तू आणि मंदिरांचा समुच्चय असलेलं एक ठिकाण. दगड! हो फक्त दगड एखादी गोष्ट नयनरम्य बनवू शकतात हे अनुभवायचं असेल तर हंपीला भेटून त्याचा साक्षात्कार होईल. हरेक ठिकाणी विविध आकारात दिसणारे हे दगड हेच हंपीचं सौंदर्य आहे. त्या दगडांना बघायचं नाही, भेटायचं. मिठी मारायची! याच दगडी प्राचीन सौंदर्याच्या आपण आपोआप प्रेमात पडत जातो. इथे जितका जास्त वेळ घालवू तितकं इथे रुळत जाऊ यात दुमत नसावं! हे तसं पर्यटन स्थळ असल्याने इथे बऱ्यापैकी गर्दी असते असं ऐकलंय आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलंही.
इथल्या मंदिरांमध्ये देवाची मूर्ती नाहीय. अपवाद विरुपाक्ष मंदिर. या एकाच मंदिरात मूर्ती आहे आणि तिथे रोज साग्रसंगीत पूजाविधीही होतात. भव्य मंदिरांचे विविध कोने, नक्षीकाम, विविध लहान मुर्तींचे कोरीवकाम, अवशेष पाहताना अंतर्मुख व्हायला होतं. इतिहासाची आवड असेल आणि तो वाचून गेलो तर रिलेट करणं सोपं होतं, चालना मिळते.
वास्तू, मंदिरं, शिल्प, मूर्ती, भग्न अवशेष, मोठ्ठे मोठ्ठे दगड या प्रत्येक भागाला भेटताना मनात वेगवेगळ्या भावनांची गर्दी होत राहते. प्रेम, सौंदर्याची भुरळ, भोगलोलूपता, उदासीनता, वैराग्य, अलिप्तता या सगळ्यासोबत स्वतःला विसरून समोरच्या गोष्टीशी एकरूप होत हरवून जाणं असं सारं काही मनात वर खाली होत राहतं! दिवसातून एकदा निवांत श्वास घेत दोन घडी एका मोठ्या विस्तीर्ण दगडावर बसून डोळ्यांनी पाहिलेलं/ हुंदडलेलं हे शहर डोळे बंद करून स्पर्शायचं! शांतीचा एक हळुवार स्पर्श अनुभवाला येतोच. (हे असं डोळ्याआड पुन्हा फिरणं मी सोलो ट्रिप मध्ये करायला शिकले)
जायचं कसं?
मुंबई वरून थेट स्लीपर बस ( सुखाचा व्यवस्थित प्रवास). ही बस आपल्याला हॉस्पेट या ठिकाणी सोडते. इथून हंपीला जाण्यासाठी वैयक्तिक रिक्षा करू शकता जी 200-250 रुपये घेते. किंवा लोकल ट्रान्सपोर्टमधून फिरणं जमत असेल तर हॉस्पेटच्या बस डेपोमधून थेट st – 16 रुपये तिकीट.
राहायचं कुठे?
विरुपाक्ष मंदिर शहराच्या मध्यावर आहे. तिथून सर्व आसपास आहे. त्यामुळे आम्ही तिथेच राहिलो होतो. इथले गेस्ट हाऊस किंवा लॉज म्हणजे खरंतर होम स्टे असतात. ३०० ते १०००/Day च्या हिशोबाने तुम्ही सोयी सुविधांच्या गरजांनुसार निवडू शकता. हंपी चित्रपट जिथे चित्रित झाला ते गेस्ट हाऊस म्हणजे पद्मा गेस्ट हाऊस. आम्ही तिथे 1 दिवस राहिलो. बऱ्याच ऑनलाइन ब्लॉग मध्येही याचा उल्लेख आढळतो. मात्र आम्हाला दोघांना अर्चना रिव्हर व्ह्यू गेस्ट हाऊस फारच बरं वाटलं. सोयी, व्यवस्था आणि खिसा या सर्वच दृष्टीने. बाकी शहराच्या मध्यावर राहायला हवं असं नाही बरेच वेगवेगळे पर्याय आहेत.
फिरायचं कसं?
इथे फिरण्याआधी एकदा हंपीचा नकाशा बघून घ्यायचा. छोटंसं गाव असल्याने अगदीच पाठ होईल असं आहे. त्यानुसार ठिकाणांची गटवारी करायची. नकाशावर दिसणाऱ्या ठिकाणांच्या गटानुसार फिरायचं. उदा.. विरुपाक्ष मंदिर आणि आजूबाजूचा परिसर, श्रीकृष्ण मंदिर आणि इतर वास्तू, मतंग हिल्स आणि इतर वास्तू समूह, विठ्ठल मंदिर आणि इतर, हिप्पी आयलंड वगैरे. गट यासाठी करावेत कारण एका गटात ठिकाणं बरीच दिसली तरी एकीकडे गेलो की दुसरं ठिकाण अगदीच जवळ आहे.
फिरण्याची साधनं:
इथे यातही बरेच पर्याय आहेत.
तुम्ही थेट ऑटो घेऊन फिरू शकता. ते तुम्हाला सर्व फिरवून आणतात. संपूर्ण दिवसाचे 1500 ते 1800 रुपये. तर अर्धा दिवस जवळपास 800 रुपये.
दुसरं म्हणजे बाईक/स्कुटी घेऊन फिरू शकता. ज्याचं भाडं दिवसाला 500 ते 600 रुपये आहे.
तिसरं म्हणजे सायकल किंवा E बायसिकल घेऊन फिरू शकता. याचं भाडं दिवसाला 100 रुपये आहे. ( ते तुम्हाला 200-300 ही सांगू शकतात लेकीन तुम 100 पे अडे रहना)
आणि चौथं म्हणजे पायी फिरू शकता. हे सोयीचंही आहे काही ठिकाणी. म्हणजे काही ठिकाणे चालत 2 किमी तर गाडीने रस्त्याने 12 किमी वगैरे असं आहे.
आपली आवड आणि सवड बघून योग्य तो पर्याय निवडायचा. आम्ही एक दिवस सायकल आणि एक दिवस पायी असं फिरलो.
हंपी फिरण्यासाठी दोन दिवस पुरेसे आहेत. फार तर अडीच!
पण फिरताना मोकळे बिनधास्त आणि उनाड फिरा! इथली दगडं साद घालतात. मंदिरं अंतर्मुख करतात. सौंदर्याची भुरळ पाडत बहिर्मुख करणारी मंदिरं आणि दगडच हळूहळू अंतर्मुख करतात. ते ते क्षण खूप मस्त वाटतात.
खायचं काय?
इथे मेदूवडा फारसा मिळत नाही. अप्पे, डोसा, पुरी भाजी असं मिळतं. ते लोकल टपऱ्या, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये खाणं सोयीस्कर. टेबलांऐवजी जमिनीवर गाद्या टाकून बैठक व्यवस्था केलेली हॉटेल्स इथे बरीच आहेत. ते जरा बरं वाटतं. आम्ही नाश्ता जेवण असं प्रत्येक वेळी वेगवेगळीकडे जाण्याचा प्रयत्न केला.
बेस्ट प्लेस : मँगो ट्री हॉटेल – इथे जाऊन आलेलं कोणीही या हॉटेलचा पर्याय सुचवेलच. इथे आवर्जून साऊथ इंडियन थाळी खा! Yummmm!
अर्चना गेस्ट हाऊसचा चहा आणि कांदा भजी!
मतंग वरचा सूर्योदय आणि हेमकूटावरचा सूर्यास्त. हा सूर्यास्त बघताना विरुपाक्ष मंदिरातून येणारा मंत्रोच्चारांचा आवाज हे सगळं भारी वाटतं.
ट्रिप संपली तरी याची स्पंदने आठवत राहतात. स्पर्शत राहतात.
*कोरॅकल राईड हे आपलं हौस म्हणून करावंच! मज्जा येते! तुंगभद्रेच्या पाण्याला स्पर्श करत कोरॅकल मधून फिरावं, मधेच गिरकी घ्यावी त्या नावाड्याशी गप्पा माराव्यात वगैरे वगैरे…
खरेदी करायला बरंच काही आहे जे आवडेल ते घ्यायचं. तसं मुंबईत सर्रास सर्वच मिळत असल्याने मला नवीन असं काही वाटलं नाही पण एखादी हंपीची आठवण म्हणून काहीतरी घ्यावं.
न संपणारं काहीतरी…
परत येणार नाही याच विचाराने मनभर फिरावं कुठलही ठिकाण!
तसं मी पुन्हा रोड ट्रिप करेन इथे असं ठरवून परतले हा विषय वेगळा😜