हंपी

तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवित उभे आहे. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा या अवशेषांना दिला गेला आहे आणि त्यामुळे त्याचे जतनही उत्तम प्रकारे केले गेले आहे.

हरिहर आणि बुक्क या दोन महापराक्रमी भावांनी स्थापलेले विजयनगरचे साम्राज्य म्हणजे ‘जहाँ डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा’ हे वर्णन सार्थ करणारे साम्राज्य होते. अतिशय सुंदर, प्रशस्त रस्ते, भव्य देवळे, धर्मशाळा, किल्ले, प्रंचड मोठे हमामखाने, कालवे, हस्तीशाळा, घोड्यांचे तबेले, देखणा आणि मालाने तुडुंब भरलेला बाजार, कोरीव कामाचे स्तंभ यांनी नटविलेले हे साम्राज्य. हे दोघे भाऊही महापराक्रमी आणि अतिशय अभिमानी होते. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू येथल्या बाजारात मिळतात, अशी याची ख्याती होती. कस्तुरी, हिरे, मोती, माणके, सिल्क, जर, घोडे अशा अनेक वस्तूंची खरेदी विक्री येथे केली जात असे. त्यासाठी देशा-परदेशातले व्यापारी येथे येत असत. आता हे सारे शोधायचे हे भग्नावशेषातून. मात्र कल्पनाशक्ती चांगली असेल तर आजही कल्पनेतून हे वैभव सहज पाहता येते.

आता केवळ शिळा होऊन राहिलेल्या या ठिकाणी हिंडणे म्हणजे गतवैभवाच्या खुणा शोधत केलेला शांत प्रवास. बहुतेक महत्त्वाच्या इमारती दोन भागात आहेत. रॉयल सेंटर आणि धार्मिक सेंटर. भग्नावशेषही या वैभवाचा आरसा दाखविण्यास पुरेसे आहेत. कितीही वेळा येथे भेट दिली तरी दरवेळी कांहीतरी नवे गवसतेच. येथे असलेल्या प्रत्येक अवशेषाची एक कथा आहे. दगडातील रथ, विठ्ठल मंदिर, राजाचा महाल, राणीचा हमामखाना, कमल महाल, पुष्करणी, हजारराम मंदिर, विरूपाक्ष मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, गणेश प्रतिमा यांचे दर्शन मनाला हळवे करणारे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *