हंपी…!!!
आता हंपीकडे वळूयात सध्या हंपी इन्स्टाग्राम असुदे किंवा फेसबुक असुदे इथले फोटो पाहून लोकं तिकडे जातात मग तिकडे जाऊन रिल्स बनवून अपलोड केले जातात परंतु हंपीमध्ये जाऊन हंपी म्हणजेच विजयनगरचे साम्राज्य काय होते किती मोठे होते तसेच बहामनी पासून आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, कुतुबशाही, इमादशाही या सगळ्यांशी लढून दक्षिणेकडे राहिलेले एकमेव हिंदू साम्राज्य टिकवून ठेवले. येथे असलेले राजे कधी शाळेमध्ये शिकवले गेले नाही किंवा येथे ज्या राजांनी उदा संगम घराणे, साळूव घराणे, तुळूव घराणे यांच्यामध्ये होऊन गेलेल्या राजांची नावे देखील शिकवली गेली नाहीत.
कृष्णदेवराया सारखा महान सम्राट याच विजयनगर साम्राज्यातला महान राजा याच्याबद्दल नक्कीच शाळेमध्ये शिकवले गेले पाहिजे. फार फार तर एक पॅराग्राफ किंवा दोन ओळी यामध्ये याच्याबद्दल उल्लेख येतो आणि गोष्टी संपतात. याच्या काळात अक्षरशः विजयनगर एवढे प्रसिध्द झाले होते की दोमिंगुश पाईश आणि फेर्नाव नुनिष यांच्या समकालीन वर्णनामधून तत्कालीन विजयनगर साम्राज्य किती मोठे होते तसेच कृष्ण देवराया याची रोजची जीवनपध्दती कशी होती ही सगळी वर्णने केली आहेत. परंतु याबद्दल सांगणार कोण कारण आपल्याला तेथे जाऊनही जाणून घ्यायचे नसते.
याच विजयनगरातील शिल्पे मंदिरे वास्तू आजही तत्कालीन एवढ्या मोठ्या साम्राज्याचा इतिहास सांगायचा प्रयत्न करत असतात परंतु ते कधी जाणून घेण्याचा आपला प्रयत्न कधीच नसतो त्यामुळे हंपीमध्ये जेव्हा जाल तेव्हा तेथील इतिहास तत्कालीन राजकीय परिस्थिती तसेच तेथील मंदिरे आणि त्यावरील शिल्पे हे नक्कीच खुणावतील गोष्टी सांगतील. हंपी हे बदामी, ऐहोळे, पटदककल तसेच वेरुळ किंवा बेल्लूर सारखे अत्यंत बारकावे घेऊन कोरलेल्या शिल्पांसारखे जरी नसले तरी येथे कोरलेली शिल्पे ही तुम्हाला प्रत्येक मंदिरात सारखी दिसतात पण ही शिल्पे हंपीच्या अभ्यासाचा एक भाग आहे. कृष्ण मंदिरावर तर अक्षरशः कृष्णदेवराया सहित सैन्य ओरिसाच्या गजपतीचा पराभव करून विजयनगरामधे प्रवेश करतानाचे शिल्प कोरलेले आहे. येथील हजारा राम मंदिर म्हणजे अक्षरशः रामायणा मधील सगळ्या शिल्पांचा पट आहे. पण आपल्याला ते पहायचे नसते तर फोटो काढून यायचे असते.
मुळात विजयनगर किती मोठे होते विजयनगरमधील तत्कालीन राजकीय परिस्थिती आर्थिक परिस्थिती हे सगळे नक्कीच संदर्भ शोधून वाचून जाऊन अभ्यासणाचा विषय आहे. देवगिरीच्या यादवांच्या पराभवानंतर तसेच द्वारसमुद्राच्या होयसळांच्या पराभवानंतर दक्षिणेमध्ये एकमेव हिंदू साम्राज्य जे टिकले ते म्हणजे विजयनगरचे होते. जवळपास १३३६ पासून १५६५ पर्यंत म्हणजेच तालिकोटच्या लढाईपर्यंत या साम्राज्याने आपले अस्तित्व टिकवून ठेवले तसेच भारतातील एक महान राज्य म्हणून प्रस्थापित झाले. चौलपासून कन्याकुमारीपर्यंत जवळपास हे राज्य विस्तारलेले होते. तसेच पूर्वेला ओरिसापर्यंत या राज्याची सीमा दिसते. मध्ययुगातील इस्लामी धाडीमध्ये एवढे मोठे साम्राज्य टिकवणे हे महत्वाचे आहे भारताच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून तसेच विजयनगरचा महान सम्राट कृष्णदेवराया याच्या वीस वर्षांच्या राज्यकाळात विजयनगरच्या वैभवात भर पडली तसेच कृष्णदेवराया हा असा एक राजा आहे ज्याने आजपर्यंत कधीही त्याच्या आयुष्यात लढाई हरलेली नाही परंतु हे कोणी शिकवले नाही. याच्या कारकिर्दीत त्याने श्रीलंकेमधून तीन वेळा खंडणी वसूल केली हे देखील सांगितले जाणार नाही. दुर्दैव असे की इ.स.१५६५ मध्ये जी तालिकोटची लढाई झाली त्यानंतर इथे जी कत्तल झाली आहे ती जगाच्या इतिहासामध्ये क्वचितच दुसऱ्या कोणत्या शहरात झाली असेल. सलग ६ महिने हे साम्राज्य जळत होते.
अश्या या विजयनगरच्या साम्राज्यात जाऊन नुसते रिल्स आणि फोटो न काढता हे विजयनगर अनुभवा ही जगण्याची जागा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने इथे जाऊन येथील इतिहास आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती नक्कीच जाणून घेऊन हंपीला भेट द्यायला हवी आणि येथील राजसत्ता आणि राजे त्यांचे कार्य नक्कीच सांगायला हवे…!!!