हंपी : साम्राज्याचे अवशेष आणि अवशेषांचे साम्राज्य –

घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नसले तरी गतवैभव अनुभवता नक्कीच येते आणि मन सार्थ अभिमान, खूपकाही गमावल्याची वेदना, पराभवाचे दुःख अशा संमिश्र भावनांमध्ये अडकून पडते. आज आपण जातोय तेराव्या शतकाच्या पूर्वाधात.

गेली कित्येक दशके उत्तरेकडे राज्य करणाऱ्या मुस्लिम राजांनी विस्तारवादी धोरण स्वीकारले आणि दक्षिण भारतातील राजकीय परिस्थितीत नाट्यमय बदल झाले. होयसाळा, पंड्या, काकतीय, यादव यांसारख्या विद्यमान दक्षिण भारतीय राजांना घरघर लागली असतानाच मुस्लिम आणि संगमांनी स्थापन केलेली अनुक्रमे बहमनी आणि विजयनगर ही दोन शक्तिशाली राज्ये उदयाला येत होती.

हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी हरिहरच्या नेतृत्वाखाली विजयनगर राज्याची स्थापना करत तुगंभद्रेच्या दक्षिण तटावर वसलेल्या हंपीला आपल्या राजधानीचे शहर म्हणून निवडले. रामायणातल्या वानरांच्या राजाची, सुग्रीवाची किष्किंधा नगरी ती हीच. सीतेच्या शोधात निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऋष्यश्रुंग, मातंग, अंजना, माल्यवंत आणि हेमकूट या पाच टेकड्यांच्या कुशीत वसलेली ही हंपी.

बहामनीचा बहामनशाह आणि हरिहर-बुक्क यांच्या राज्यविस्तारासाठी आणि असलेले टिकवण्यासाठी सततच्या लढाया होणे अपरिहार्य होते. १३ व्या शतकात स्थापन झालेल्या विजयनगर साम्राज्याचा प्रवास संगम वंशाकडून पुढे चौदाव्या शतकात साळूव, तुळूव पर्यंत येत पंधराव्या शतकात कृष्णदेवरायापर्यंत झाला आणि विजयनगर खऱ्या अर्थाने भरभराटीला आले. स्थापत्य, सुबत्ता, चित्रकला, ग्रंथसंपदा, सामरिक शक्ति सगळ्याच स्तरांवर विजयनगर वैभवाच्या शिखरावर होते. कृष्णदेवराय इतका पराक्रमी योद्धा होता की  त्याच्या वाढत्या ताकदीने इतर राजे त्याला रोखायचं कसं या चिंतेत होते.

पुढे तालिकोटच्या लढाईत जरी विजयनगर साम्राज्याचा अंत झाला असला तरी आजही हंपी तितक्याच ताकदीने सतत तीन शतके मुस्लिम आक्रमणांपासून दक्षिणेला वाचवणाऱ्या या हिंदू साम्राज्याच्या देदीप्यमान यशाची साक्ष देत आहे.

हंपी, इथे इतिहास जिवंत होतो –

तुम्हाला किष्किंधा नगरी पाहायची आहे की विजयनगर?

ज्या देशाला आपला भूगोल माहीत नसतो, त्या देशाचा इतिहास त्याची निर्भत्सना करतो. हंपीचा इतिहास आणि भूगोल दोन्ही वेगळेच. त्रेता युगातली किष्किंधा तेराव्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या रूपाने थाटात उभी होती.

जमिनीखालचा लाव्हा भूगर्भाला भेदून बाहेर येऊन तयार झालेले मोठेले अजस्त्र दगड, सुपीक माळरानं, अखंड वाहणारी तुंगभद्रा आणि म्हणूनच विजयनगर सम्राज्याची राजधानी स्थापण्यासाठी हंपीची निवड केली गेली असावी.

तिथे काय नव्हतं? चार लाखापेक्षा जास्त खडं सैन्य, घोड्यांचे बाजार, हिऱ्या- मोत्यांच्या पेठा, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू येथल्या बाजारात मिळतात, अशी याची ख्याती होती. आकाशाला भिडणारी गोपूरं, डोळ्याचे पारणे फेडणारे स्थापत्यशास्त्र, अतिशय सुंदर, प्रशस्त रस्ते, भव्य देवळे, धर्मशाळा, किल्ले, प्रचंड मोठे हमामखाने, कालवे, हस्तीशाळा. एकेकाळी या साम्राज्यातून सोन्याचा धूर निघत असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

आणि आता उरलाय तो फक्त तालिकोटच्या पराभवानंतरचा मोठ्ठा पूर्णविराम. हे शहर सतत चार दिवस लुटलं जात होत. कित्येक मंदिरं‌ भ्रष्ट झाली. पण आजही ते दगड विजयनगरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभे आहेत तेवढ्याच ताकदीने.

बदामीचा प्रत्येक दगड गुलाबी रंगाचा त्यावर केलेले कोरीवकाम तर निव्वळ अप्रतिम. चालुक्यांच्या पराक्रमाची उजळणी इथली शिल्प करतात.कॅमेऱ्यात बंदीस्त करावं असं हे सगळं नाहीच मुळी. त्यांची अनुभूती फक्त ‘याची देही याची डोळा’ घ्यावी.

Credit – Akshata Bapat(FB)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *