गणपतीचे शिर हे गजाचे असले, तरी त्याचा एक तुटलेला दात हातात असतो व दुसरा मुखाला असतो. त्याचे उंदीर हे वाहन आहे. तो चतुर्हस्त असून दात, पाश, अंकुश अशा वस्तू त्याने निरनिराळ्या हातांत धारण केलेल्या असून चौथा हात वरद असतो. ऋद्धी व सिद्धी ह्या त्याच्या पार्श्वदेवता होत. प्रारंभी तो द्विभुज असावा नंतर तो चार, आठ, दहा व सोळा हातांचा झाला. त्रिमुख गणपतीच्या मूर्ती जपानमध्ये व चतुर्मुख मूर्ती ख्मेरमध्ये आढळतात. शंकराप्रमाणेच काही मूर्तीच्या कमरेभोवती किंवा गळ्याभोवती सर्पाचे वेष्टन असते. तिबेटात गणपतीला नारीरूपातही भजतात. त्याचे उंदीर हे वाहन प्रसिद्ध असले, तरी सिंह हेही त्याचे वाहन नेपाळातील मूर्तींत दिसते. हिंदूंच्या घराच्या अथवा मंदिराच्या मुख्य द्वारावर गणपतीची मूर्ती कोरण्याची जुनी प्रथा आहे.

शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली.
स्कंदपुराणात – गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहेत. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुण्डहीन अवस्थेत जन्माला आले. नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते मस्तक स्वतःच्या शरिरावर चढवले.

शिवपुत्र गणपतीच्या अनेक कथांपैकी एक कथा अशी : गणपती हा केवळ शिवाचा पुत्र होय. शिवाने आपल्या तपःसामर्थ्याने एक सुंदर पुत्र निर्माण केला. पार्वतीने त्यास पाहिले व ती क्रुद्ध झाली. एकट्या शिवाने आपणास वगळून पुत्र निर्माण केला, हे तिला आवडले नाही. तिने त्या बालकास शाप देऊन बेडौल व गजमुख बनविले.

उत्तराखंडमधील कुमाऊं मंडळात असलेल्या अल्मोडा शहरापासून १६० कि.मी. अंतरावर अनेक पर्वतरांगा आहेत. यामधील गंगोलीहाट पर्वतरागांमधील एका पर्वतावर पाताल भुवनेश्वर नामक गुहा आहे. याच गुहेत गणपतीचे मूळ शीर ठेवण्यात आले आहे, असे सांगितले जाते. येथे गणपतीची एक मूर्ती आहे, त्यास आदी गणपती म्हटले जाते. येथील मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीचे रक्षण भगवान शंकर स्वतः करतात, अशी मान्यता आहे. पौराणिक संदर्भानुसार, त्रेतायुगातील राजा ऋतुपर्ण याने प्रथम ही गुहा पाहिली होती. तो त्या ठिकाणी गेल्याचे काही दाखले पुराणात मिळतात.

गणपतीला एकच दात आहे, दुसरा तुटलेला दात त्याच्या हातात आहे. यासंबंधीही निरनिराळ्या उपपत्ती सांगणाऱ्या कथा आहेत : शंकराने एका प्रसंगी क्रुद्ध होऊन त्याचा एक दात मोडून फेकून दिला किंवा युद्धप्रसंगी परशुरामाने गणपतीचा एक दात परशू फेकून तोडला किंवा गणपतीने रागाच्या भरात आपला एक दात मोडून त्याचा तुकडा चंद्रावर फेकला किंवा गजमुख नावाच्या असुराशी युद्ध झाले, त्या असुराने गणपतीचा एक दात मोडला, तो मोडलेला दात गणपतीने उचलून त्या असुराला फेकून मारला किंवा विनायक या स्वरूपातील अवतारात देवांतक असुराशी जे युद्ध झाले त्यात गणपतीचा एक दात मोडला परंतु त्याच दाताने प्रहार करून गजांतकाचा नाश गणपतीने केला.

गणेश आणि ओम गणेश आणि ओम श्री गणेशासोबत ओम आणि श्री गणेशाचे साम्य आहे. ओमच्या चिन्हाकडे लक्षपूर्वक पाहिल्यास आणि अक्षराच्या वरच्या भागाकडे डोळे लावले तर ते हत्तीच्या डोक्यासारखे दिसते. मागचा भाग हत्तीच्या दांड्यासारखा, खालचा भाग गणपतीच्या पोटासारखा आणि भगवंतांनी खाल्लेल्या मोदकासारखा आहे.

पत्नी रिद्धी आणि सिद्धी भगवान गणेशांच्या पत्नी रिद्धी व सिद्धी होय. श्रीगणेशाचा पुत्र म्हणून लोक शुभ आणि लाभ जाणतात. भगवान गणेशाला सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ असे दोन पुत्र झाले. लोकपरंपरेत त्यांना शुभ भाव म्हणून ओळखले जाते. ज्या भक्तांना गणपतीचा आशीर्वाद मिळतो त्यांची भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती निश्चितच होते.

गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते. कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागेही एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला. पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋृषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात.

गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे एकदा गणपती चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून उंदराच्या पाठीवरून जात होता. तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरथरू लागला. यामुळे गणपती उंदरावरून खाली पडला. त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले. गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून चंद्र हसला. हे पाहून गणपतीने चंद्राला शाप दिला की, चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. जो तुला बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे आजही लोकं चतुर्थीला चंद्राकडे पाहात नाहीत.

महर्षी वेद व्यास यांनी गणपतीला 10 दिवस महाभारताची कथा ऐकवली आणि गणपती ती कथा लिहू लागले. 10 दिवसांनी जेव्हा महर्षी वेद व्यास यांनी गणपतीला हात लावला तेव्हा गणपतीच्या शरीराचं तापमान खूपच वाढलेलं होतं. व्यासांनी गणपतीला पाण्याच्या कुंडात नेऊन त्यांच्या शरीराचे तापमान कमी केले. यानंतर गणेश विसर्जनाची परंपरा सुरू झाली.

गणपती विसर्जनाशी निगडीत अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजेच गणपतीला जल तत्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *