गधेगळ
ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली. वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन यादवकाळातही हे गधेगाळ कोरलेले आढळतात.
वीरगळांसारखीच यांची रचना असते. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत आढळतात.
घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले मुखत्वे आढळून येते .त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर संकर दाखवलेला असतो. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगळ. काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे.
नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले.
ह्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले असते.
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे
व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे.
ह्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून आहेत.
जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो.
हे गधेगाळात ‘हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ’ अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे.
महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)
अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत.