*गावोगावची लोकदैवते*
महाराष्ट्राच्या गावोगावी असणाऱ्या लोकदैवतांचे स्थान आजही इथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
आज बारामती व दौंड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन तेथील वेगळेपण जाणून घेण्याचा मी व मनोजने प्रयत्न केला.बारामती तालुक्यातील कटफळ येथील प्राचीन जानाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले .कोजागिरी पौर्णिमेला भरणारी यात्रा संस्मरणीय असते.भलामोठा आवार असणाऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर सापडलेल्या शिलालेखाने जणू काही जानाई देवीने भेट दिल्याचाच आनंद झाला लवकरच अभ्यासकांच्या मदतीने त्याचे वाचन करणार आहोत.
पारवडी येथील महादेव मंदिर,भैरवनाथ मंदिराला भेट देऊन येथील भैरवाबद्दल काही विशेष गोष्टी जाणून घेता आल्या. दौंड तालुक्यातील खडकी गावात असणाऱ्या प्राचीन महादेव मंदिराला भेट दिली.गर्द चिंचेने वेढलेल्या या मंदिराच्या परिसराने मन आणि शरीराचा थकवा कुठल्या कुठे गेला. पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या रावणगावात लहानपणापासून अनेकदा गेलो होतो परंतु अभ्यासाच्या दृष्टीने जाण्याचा योग आज आला.येथील अनेक परंपरा,अख्यायिका खूपच वेगळ्या आहेत लवकरच याबद्दलही खूप काही तुम्हाला सांगणार आहोत. कुरकुंभ हे फिरंगाई देवीचं गाव म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहेच परंतु येथे दुर्लक्षित असणारे टेकडीवरचे झणझणी देवीचे मंदिर मनात खूप अस्वस्थता सोडून गेले.या प्राचीन मंदिराची आणि अत्यंत देखण्या परंतु आता शेवटची घटका मोजणाऱ्या भव्य दिपमाळेची अवस्था पाहताना या मंदिराने पूर्वी किती वैभव अनुभवले असेल याच विचारात मन हरवून गेले.एकंदरीत कटफळ मधून शिलालेख सापडल्यावर उत्साही झालेलं मन कुरकुंभच्या झणझणी देवीच्या आवारातून असंख्य अस्वस्थ प्रश्नांचे वादळ घेऊन परतले.