इतिहासाला भलं मोठं प्रवेशद्वार असतं… काळाच्या अगणित घटनांचा साक्षीदार असलेलं!
फिरस्ती करताना प्रत्येकाला हे इतिहासाचं प्रवेशद्वार दिसतं… अगदी ठळकपणे! आता हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो की या प्रवेशद्वारातून आत जायचे, नुसतंच त्याच्या समोर उभं राहून बघत राहायचं की त्या प्रवेशद्वारातून आत डोकावून पुढे निघून जायचं. पण एक मात्र खरं आहे, हे प्रवेशद्वार तुमचं खुल्या दिलाने स्वागत करते, घटनांचा कोलाज दाखवते, सुखदुःख आणि भावभावनांचा पट खोलते….
मी उभा आहे राशोल किल्ला आणि सेमीनारीच्या प्रवेशद्वारावर. गोमंतक भूमीत, झुआरी नदीकाठी! इतिहासाच्या उदरात लपलेल्या अनेक घटनांचा सोबती असलेल्या या जागेशी हितगुज करत….