लेणी म्हणजे काय? –

लेणी म्हणजे काय तर लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव काम. लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. लेणी ही संज्ञा सामान्यपणे मानवनिर्मित गुहांना वापरली जाते. ज्यांच्या उपयोग तपस्या-साधना-विश्रांती करण्यासाठी केला जाई. प्रथम साधी असलेली नंतर चित्रे व शिल्पे यांनी अलंकृत केली गेली. लेण्यांना गुहा, गुंफा, शैलगृहे, शिलामंदिरे, प्रस्तरालये अशी अन्य नावे देखील आहेत. लेणी तयार करणे हे दीर्घ काळ चालणारे काम होते. छिन्नी व हातोडी ही दोनच हत्यारे आणि दगडही कठीण. कधी कधी काम वरून खाली करत यावे लागे. एखादा घाव जोराने पडला अथवा दगडाचा टवका जास्त उडाला तर दुरुस्ती करणे शक्य नव्हते. जसे मूर्ति करतांना चुकले तर दुसरा दगड घेऊन दुसरी मूर्ति करणे शक्य असते. इथे त्याला अजिबात वाव नव्हता. थोडक्यात, वेळखावू आणि जबाबदारीचे काम. उदा. वेरुळचे कैलास लेणे तयार होण्यास एकुण  १३५ वर्षे लागले !

लेणी शब्दाचा उगम –

लयन (गृह) या संस्कृत शब्दावरून लेण हा शब्द झाला व लेणचे रुपांतर लेणे मध्ये झाले. नाशिकजवळच्या पांडव लेण्यातील लेखात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला दिसतो. “एतच लेण महादेवी महाराज मातामहाराज पतामही ददाति निकायस महाबनियान भिक्षु संघम.” ‘लयन’ म्हणजे ‘गृह’. लेण्यांना गुहा, गुंफा, शैलगृहे, शिलामंदिरे, प्रस्तरालये अशी अन्य नावे देखील आहेत.

लेणीचा इतिहास –

अश्मयुगात मनुष्य गुहेत राहत होता. एकाकी मनुष्याने पशुपक्ष्यांच्या संगतीत, निसर्गाच्या सानीध्यात शेतीच्या सहवासाने, आजुबाजूची सारी संवेदना छन्नी हातोड्यांच्या सहाय्याने डोंगरावर खोदली व त्यातुन सुरूवातीला ओबडधोबड कलाकृती, शिल्पकृती मानव, प्राणी, पक्षी, निसर्गाचे रुप चितारले गेले. हळूहळू मानवी कल्पना बुद्धी, कौशल्याचा विकास झाला व लेणीची सुबकता आकाराला आली.  अशांपैकी काही निवडक गुहास्थानांमधल्या खडकांच्या भिंतींवर आदिमानवाने चित्रे खोदून आपल्या उत्कृष्ट चित्रकलेचे नमुने मागे ठेवलेले आहेत. प्रारंभीच्या काळात खोदलेली लेणीही त्या त्या डोंगरांच्या पायथ्याशी असून ती साधी, लहान व ओबडधोबड अशी होती. नंतरच्या काळातील लेणी पर्वतश्रेणीच्या वरच्या भागांत क्रमशः आढळतात व अखेरच्या टप्प्यातील लेणी तर माथ्यावर कोरलेली आहेत. प्रथम शिल्पकृती घडवल्या व नंतर चित्रकला अवतरली. (हा क्रम उलटा हि असू शकतो) परंतु चित्रे शिल्पांइतकी दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. त्यामुळे हा क्रम निश्चीत सांगता येत नाही.  ३ र्या शतकापूर्वीच्या काही लेण्यात, लाकूड व विटांचे प्रमाण असे. सांची, पवना, अमरावती इत्यादी ठीकाणी हे आढळते.

ज्या धर्मीयांच्या वापराकरिता ही लेणी निर्माण करण्यात आली त्या धर्मावरून या लेणींना बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी संबोधले जाते.

बौद्ध लेणीतही हीनयान पंथातील लेणी सर्व प्राचिन. यात बुद्धाची मूर्ती नव्हती परंतु ही कसर महायान पंथाने भरून काढली. त्यांच्या लेण्यात मूर्ती आहेत. बौद्ध लेण्यात चैत्य व विहार हे दोन प्रकार दिसून येतात. जैन लेण्यांमध्ये चैत्यगृह नाही फक्त विहार दिसून येते. हिंदू/ब्राह्मणी लेण्यात मंदिर, मंडप, रथ पाहायला मिळतात. येथे आपल्याला देवतांच्या मूर्ति, शिवलिंग इ. दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *