ज्ञानप्राप्ती | बुध्दपौर्णिमा –
हठयोगाच्या उग्र साधनेनंतर एके दिवशी सिद्धार्थाला साधनेचा मध्यम मार्ग सापडला. एकेदिवशी काही महिलांचा समूह सिद्धार्थ साधना करत असलेल्या ठिकाणाहून जात असताना त्या गात असलेल्या गाण्याचे बोल त्याच्या कानावर पडले. त्या गाण्याचा अर्थ असा होता की ‘हे सखी, विणेची तार अगदी घट्ट बांधली तर तुझा सूर बिघडेल, तसेच जर तू ती तार अगदी सैल बांधली तरी तुझा सूर बिघडणार आहे, आणि म्हणून हे सखी तू तुझ्या विणेची तार अशी बांध कि ती अगदी घट्ट नसेल आणि अगदी सैलसुद्धा नसेल, मग बघ तुझे सूर कसे लोकांच्या मनाचा ठाव घेतात.’
ह्या गीतांचे सूर कानावर पडताच सिद्धार्थाला मध्यम मार्गाची जाणीव झाली, त्यानंतर त्यांनी हठयोग आणि उपास सोडून साधना चालू ठेवली.
पिंपळाच्या झाडाखाली साधना करत असताना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना (बोधी) ज्ञानप्राप्ती झाली. त्यांनी आपले डोळे उघडले तिथंच गुरे राखणाऱ्या सुजाता नावाच्या मुलीने त्यांना फळांचा रस प्यायला दिला. काही ठिकाणी हि सुजाता राजकुमारी असून तिने बुद्धांना सुवर्णपात्रात खीर दिली अशी माहिती उपलब्ध आहे.
याच्या नंतरही त्यांनी सात आठवडे तशीच तपश्चर्या केली आणि त्यांना धर्मतत्त्वाचा साक्षात्कार झाला.